सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपूरचे वसंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर होऊन ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते देशमुख यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. तर, मावळते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदावर स्थान देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनी पुण्यात झालेल्या मेळाव्यात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार वसंतराव देशमुख यांच्याकडे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार अकलूजमध्ये त्यांना निवडीचे अधिकृत पत्र देण्यात आले. या वेळी झालेल्या छोटेखानी सभेत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यासह बाबूराव गायकवाड (सांगोला), विश्वास बारबोले (बार्शी), नागेश फाटे, जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील (बोरगाव, माळशिरस), महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुजे, युवती आघाडीच्या विनंती कुलकर्णी आदींसह इतर नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख हे कासेगाव (पंढरपूर) येथील असून, त्यांनी यापूर्वी मोहिते-पाटील व पंढरपूरचे दिवंगत नेते सुधाकर परिचारक यांच्यासमवेत अनेक वर्षे काम केले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना व अन्य संस्थांवर केलेल्या कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
या वेळी बोलताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सर्व लहान-थोर नेते व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आणि पक्षाची बांधणी करण्याचा निर्धार केला. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी, जिल्ह्यात सोलापूर विभागात मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट येथे सूक्ष्म नियोजन करून पक्षाची मजबूत बांधणी करून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार बोलून दाखविला.