हिंगोली तालुक्यातील जामठी खूर्द येथे शेतीच्या वादावरून झालेल्या दुहेरी खून प्रकरणामध्ये नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांनी सोमवारी हा निकाल दिला आहे. अंबादास भवर व उद्धव भवर, अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर प्रल्हाद आबाजी भवर, रामप्रसाद आबाजी भवर, आत्माराम प्रल्हाद भवर, बालाजी रामप्रसाद भवर, माधव प्रल्हाद भवर, नंदाबाई आत्माराम भवर, नामदेव दाजीबा घ्यार, विठ्ठल दाजीबा घ्यार, पार्वतीबाई माधव भवर, अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुजानबाई भवर यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील जामठी खूर्द येथील अंबादास आबाजी भवर व त्यांचा भाऊ रामप्रसाद आबाजी भवर यांच्यामध्ये त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतीचा वाद होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये किरकोळ हाणामारीच्या घटनाही घडत होत्या. दरम्यान, २२ जानेवारी २०१६ रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अंबादास भवर, उद्धव भवर, संजय भवर हे शेतात काम करत होते. यावेळी शेतामध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला. वादानंतर दहा जणांनी अंबादास भवर, उद्धव भवर व संजय भवर यांना तलवारी, काठीने कुऱ्हाडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये अंबादास भवर व उद्धव भवर यांचा मृत्यू झाला. तर संजय भवर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी अयोध्याबाई उद्धव भवर ( रा. जामठी खूर्द ) यांच्या तक्रारी वरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयचे न्यायाधीश पी. व्हि. बुलबुले यांच्या समोर सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दुहेरी खून प्रकरणात नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. एन.एस. मुटकुळे यांनी काम पाहिले.