देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. देशभरातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. देशातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने यंदाच्या निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’ असा नारा दिला आहे. भाजपाने दावा केला आहे की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ४०० हून अधिक जागा जिंकेल. परंतु, ४०० हून अधिक जागा जिंकणं हे अत्यंत कठीण काम आहे. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषक, राजकीय रणनीतिकारांच्या मते ४०० हून अधिक जागा जिंकणं शक्य नाही. भारतात लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागा जिंकणं आवश्यक असतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाच्या मित्रपक्षांनी (एनडीएतीत घटकपक्षांनी ५१ जागा जिंकल्या होत्या.

एनडीए यंदा ४०० पारची घोषणा करत आहे. तर भाजपातील अनेक नेत्यांनी दावा केला आहे की, एकटी भाजपा ४०० पैकी ३७० जागा जिंकेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनादेखील भाजपा ३७० हून अधिक जागा जिंकेल असं वाटतंय. गडकरी यांनी काही वेळापूर्वी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, यंदा आम्ही दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात जागा जिंकणार आहोत. त्यामुळे आम्ही ३७० पेक्षा अधिक जागा जिंकू.

गडकरी म्हणाले, “गेल्या १० वर्षांमध्ये आमच्या सरकारने खूप चांगली आणि मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. त्यामुळे एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील.” विरोधी पक्षांबाबत गडकरी म्हणाले, “केवळ सरकारवर आरोप करण्याशिवाय विरोधकांनी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी काहीतरी करायला हवं.” गडकरी यंदा नागपुरातून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

हे ही वाचा >> “मागच्या विधानसभेला भाजपाने आमच्यासमोर बंडखोर उभे केलेले”, गुलाबराव पाटलांच्या आरोपांवर गिरीश महाजन म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन गडकरी म्हणाले, गेल्या १० वर्षांमध्ये आमच्या सरकारने ईशान्य भारतात खूप कामं केली आहेत. त्याचे चांगले परिणाम आम्हाला आतापासूनच दिसत आहेत. तसेच आमच्या कार्यकर्त्यांनीदेखील त्या भागात जनसंपर्क वाढवला आहे. त्या भागात आमचा पक्ष आता मजबूत झाला आहे. यासह तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही पक्षसंघटना मजबूत झाली आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये उत्तर भारतातल्या मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला होताच. परंतु, यावेळी दक्षिण भारतातल्या लोकांचाही आम्ही विश्वास संपादन केला आहे. तिकडे कामं केली आहेत. त्यामुळे एकटी भारतीय जनता पार्टी ३७० हून अधिक जागा जिंकेल आणि एनडीए ४०० हून अधिक जागा जिंकेल.