भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी हे विधान केल्याचं दिसून येत आहे.

“ ९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं…आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय…खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…” असं नितेश राणे ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला असून यामध्ये नितेश राणे म्हणतात, “ आपल्या सगळ्यांनाच चांगलच माहिती असेल, की १९९३ च्या दंगलीनंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी हिंदुंना वाचवलं. मुंबईच्या हिंदुंना वाचवलं आणि त्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला. आज इतक्या वर्षानंतर त्यांचाच मुलगा १९९३ च्या दंगलीमधील जे मुख्य आरोप आहेत, त्यांचा जो बिझिनेस पार्टनर मंत्री आहे. त्यांच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसलेले आहेत. ”

याचबरोबर, “ मला वाटतं आता खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलेली आहे. हा समस्त हिंदुंचा अपमान आहे. म्हणून शिवसैनिक आता स्मृतिस्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडणार का? नाही शिंपडत असतील तर हे महान कार्य मीच येणाऱ्या दिवसात करणार आहे.” असं देखील नितेश राणे यांनी बोलून दाखवलं आहे.

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला भेट दिली होती. मात्र त्यानंतर सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतिस्थळाचे शुद्धिकरण केले होते. आता याच अनुषंगाने नितेश राणे यांनी टीका केल्याचं दिसून येत आहे.