आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील न झालेल्या कामांची लाखोची देयके वास्तुविशारद म्हणून हरिश खडसे यांनी साक्षांकित केल्याची बाब आता पोलिसांकडे झालेल्या तक्रारीतून उघड झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कामेही त्यांचे बंधू व पुतणे यांचीच कंपनी बघत होती, हेही आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली.

न  झालेली  कामेही  साक्षांकित केल्याचा  खडसे  कुटुंबीयांचा  प्रताप
दरम्यान, हरिश खडसे व त्यांच्या वडिलांनी यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असा दावा लोकसत्ताशी बोलताना केला. समितीचे सचिव जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत, असे ते म्हणाले. पणन मंडळाच्या पॅनलवर असलेले हरिश खडसे यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांची कामे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा जिल्हा मंत्री एकनाथ खडसे यांचे प्रभावक्षेत्र म्हणून ओळखला जातो. हा योगायोग निश्चित नाही, असा टोला आज या मुद्यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी लगावला. आज बहिष्कारामुळे विधिमंडळात हा प्रश्न उचलता आला नाही, पण या मुद्याचा नक्की पाठपुरावा करू, असे ते म्हणाले. भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही, असे सांगणारे मुख्यमंत्री खडसेंबाबत कोणती भूमिका घेणार, असा सवाल त्यांनी केला.