विश्वास पवार
लोणंद:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचा पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीच्या वारीला निघालेला पालखी सोहळा दोन दिवसाच्या मुक्कामासाठी लोणंदला विसावला आहे,माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातून मोठा महासागर लोटला आहे.
आळंदीहून पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर होऊन निघालेला वैष्णवांचा या मेळा टाळ -मृदुंग व हरीनामाचा गजरात लोणंद नगरीत विसावला आहे.ज्ञानियाचा राजा असलेल्या माऊलीचा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यासह आला असुन माऊलीच्या पालखी सोहळयामुळे अवघी लोणंदनगरी भक्तीरसात ओलीचिंब भिजली आहे. लोणंदनगरीत माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची जनसागर लोटला दर्शनाच्या रांगा १ कि मी पर्यत लागल्या आहेत, शहरात वारकऱ्याकडुन सुरु असलेला टाळमृदुंगाचा गजर,भाविक करत असलेला माऊली माऊलीचा जयघोष यामुळे अवघी लोणंदनगरीच पंढरी झाली आहे.लोणंद मुक्कामी राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असुन लाखो भाविकांनी माऊलीच्या चरणी माथा टेकुन दर्शनाचा लाभ घेत आहेत. माऊलींच्या चरणावर माथा टेकवल्यावर माऊली भेटीचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
हेही वाचा >>> “आदिपुरुष या सिनेमावर बहिष्कार घाला कारण…”, कालीचरण महाराजांचं हिंदू समाजाला आवाहन
‘साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा’ या आनंदाने सातारा जिल्हा प्रशासन, लोणंद येथील नागरिक वारकऱ्यांच्या आणि भाविकांचे स्वागत आणि त्यांची व्यवस्था करत आहे
छत्रपती शिवाजी महाराजाच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्हयात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने रविवारी दुपारी प्रवेश केला आहे,माऊलीचे सातारा जिल्हयात लोणंदला दोन, तरडगावला एक, फलटणला एक तर बरडला एक असे एकुण पाच मुक्काम होणार आहेत, कोकणासह राज्यातुन आलेल्या अनेक दिंडया लोणंद मुक्कामी माऊलीच्या पालखी सोहळयात सहभागी झाल्या आहेत. लोणंद मुक्कामी कोल्हापुर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयासह, कर्नाटक राज्यातील भविक माऊलीच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत. माऊलीच्या दर्शनासाठी रखरखते उन्ह असताना देखील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
हेही वाचा >>> शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनिषा कायंदे अपात्र ठरणार? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…
माऊलीची दर्शन रांग पालखीतळ ते खंडाळा चौक ते सातारा रोड जुनी भाजी मंडई अशी सुमारे १ किलोमीटर पर्यत लागली होती,महिला पुरुषांसाठी स्वतंत्र रांग करण्यात आली आहे. दर्शन रांगेवर छत टाकण्यात आल्याने उन्हापासून भाविकांचा बचाव झाला. माऊली माऊलींच्या बरोबरच माऊलींच्या रथाचे आणि अश्वांचे दर्शन घेण्यासाठी ही भाविकांची गर्दी होत होती. उद्या मंगळवारी दुपारी पालखी सोहळा सरहदचा ओढा पार करून फलटण तालुक्यात प्रवेश करणार आहे .चांदोबाचा लिंब तरडगाव येथे पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होणार आहे. तरडगाव येथील पालखी तळावर पालखी सोहळा मुक्कामी विसवणार आहे.