नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपल्या हयातीतच पीपल्स आणि सायन्स या दोन महाविद्यालयांसाठी नांदेडच्या मध्यवर्ती भागात ८५ एकर जागा मिळविली. त्यांच्या तसेच गोविंदभाई श्रॉफ यांच्या पश्चात या शैक्षणिक परिसराचा विकास ७५ वर्षांनंतरही कागदोपत्रीच आहे, तर विद्यापीठाच्या पथकाने बुधवारी या दोन्ही महाविद्यालयांना भेट दिल्यानंतर एकंदर परिस्थितीचे वर्णन ‘विदारक’ अशा शब्दांत केले आहे.
‘पीपल्स’ म्हणजे नांदेडमधील पहिले महाविद्यालय. सायन्स कॉलेजची स्थापना १९६३ सालची. स्वामीजी आणि श्रॉफ यांची गौरवशाली परंपरा सांगत संस्थेचे पदाधिकारी कारभार चालवत असले, तरी या दोन्ही महाविद्यालयांतील गलथानपणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी प्रत्यक्ष पाहिला. या पथकाने वरील दोन्ही महाविद्यालयांना दिलेली आकस्मिक भेट नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, त्यावर अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विद्यापीठाच्या प्रसिद्धिपत्रकात वरील पथकाच्या महाविद्यालय भेटीची माहिती बुधवारी सायंकाळी उशिरा देण्यात आली. त्यातून ‘लोकसत्ता’च्या वृत्ताला दुजोराच मिळाला. सर्व महाविद्यालयांमधील शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी कुलगुरूंनी वरील उपक्रम सुरू केल्याचे पत्रकात म्हटले आहे; पण चासकर, महाजन व इतर अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी ज्या महाविद्यालयांना भेट दिली, त्या महाविद्यालयांचा उल्लेख विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकात केला नाही.
त्यात म्हटले आहे, की कुलगुरूंनी नांदेड शहरातील दोन महाविद्यालयांना २ जुलै रोजी सकाळी अचानक भेट दिली. या भेटीत तेथील परिस्थिती विदारक होती. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे निदर्शनास आले. महाविद्यालयाचे प्राचार्य, काही प्राध्यापक आणि विद्यार्थी अनुपस्थित होते, वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या तासिका चालू नसल्याचे निदर्शनास आले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा हजेरीपट तयार नव्हता, काही तास सुरू होेते; पण वर्गामध्ये एक किंवा दोन विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळून आले.
कुलगुरू आणि विद्यापीठाच्या पथकाच्या आकस्मिक भेटीवर पीपल्स कॉलेजमधील एका प्राध्यापकांनी आक्षेप नोंदविला. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन केवळ १५ दिवस उलटले आहेत. अजूनही अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू असल्यामुळे वर्ग नियमित सुरू झालेले नाहीत. सर्व जुळवाजुळव होण्याआधीच विद्यापीठ पथकाने भेट दिली, असे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
प्राचार्य सकाळीच हजर
विद्यापीठाचे पथक बुधवारी पीपल्स कॉलेजमध्ये दाखल झाले तेव्हा प्राचार्य आणि अनेक प्राध्यापक महाविद्यालयात हजर नसल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले प्राचार्य डॉ. जाधव गुरुवारी सकाळीच महाविद्यालयामध्ये हजर होते. सर्व प्राध्यापकांनी वेळापत्रकाप्रमाणे सहा तास महाविद्यालयामध्ये हजर राहिलेच पाहिजे, असा फतवा जारी करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमध्ये वरील दोन्ही महाविद्यालये चालविणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.