रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर व राजापुर शहर भागात पुरस्थीती निर्माण झाली आहे. या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे. या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.
रत्नागिरी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यातील हरचेरी व चांदेराई परिसरामध्ये पुराचे पाणी भरल्याने दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हरचेरी रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून बंद करण्यात आली आहे. याठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहावे व महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच पोमेंडी व सोमेश्वर भागात देखील पुराचे पाणी शिरल्याने काही घरांना याचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे. या मार्गावरील सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत. पावसामुळे कोकण रेल्वेची गती मंदावली आहे. कोकण रेल्वे मार्गांवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या उशिराने धावत आहेत. यामध्ये कोकण कन्या २ तास १५ मिनिटे , मेंगलोर मुंबई ३ तास ३८ मिनिटे, रत्नागिरी दिवा १तास १०मिनिटे, गरीब रथ २ तास ३४ मिनिटे, मंगला एक्सप्रेस १.०० तास, उदना एक्सप्रेस ३ तास २९ मिनिटे, जबलपूर सुपरफास्ट १.०० तास येवढ्या गाड्या उशिराने धावत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्याच नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असल्याने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजापुर शहरात पुराचे पाणी शिरले आहे. याचा फटका येथील दुकानदारांना बसला आहे. संगमेश्वर बाजारपेठेत देखील पाणी भरल्याने सर्वांची तारांबळ उडाली. वाशिष्टी नदी धोका पातळीकडे वाटचाल करीत असल्याने शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चिपळूण कोळके धरणातून पाणी सोडणार असल्याने नागरिकांनी सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः८२ मी म्हणजेच इशारा पातळीवर वाहत आहे.
कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३५.१५ मी. आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात सोमवारी सकाळी ८ पासून मंगळवारी ८ पर्यंत म्हणजे २४ तासामध्ये २२० मिमी पाऊस पडलेला आहे. नवजा येथे सोमवारी ८ वा पासून मंगळवारी ८ वाजेपर्यंत ३१६ मिमी पाऊस पडलेला आहे. मंगळवारी सकाळी ८ ते २ यावेळेत ९६ मिमी पाऊस पडलेला आहे. एक मशिन सुरू आहे. दुपारी ३ः५० वा ओहोटी लागली. ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व राष्ट्रीय आपत्ती दलाची पथके तैनात ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. चिपळूण बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका , वडनाका, आईस फॅक्टरी, पेठमाफ इंडियन जीम या भागात एक ते दीड फूट पाणी आत शिरले आहे.
सखल भागातील विद्युत पुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेला आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना पुढील ८ तास सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. खेर्डी येथे कराड रोडवर पाणी असल्याने व हेळवाक येथे रस्त्यावर पाणी साचल्याने चिपळूण-कराड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोका पातळीच्या वर वाहत असल्याने असल्याने पुन्हा खेड शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.