रत्नागिरी : आई पासून लांब झालेल्या बिबट्याच्या बछड्याला त्याच्या आईला भेटवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र आईला भेटण्याची बछड्याची वेळ कधी येणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे. लांजा – काजरघाटी मार्गावरील पूनस संसारे फाटा येथे रस्ता ओलांडताना मादी बिबट्याच्या तोंडातून १५ दिवसांचा बछडा सुटून रस्त्यावर पडल्याची घटना घडली. सद्या या बछड्याची देखभाल वन खात्याकडून करण्यात येत आहे.

लांजा – काजरघाटी मार्गावरील पूनस संसारे फाटा येथे दि.८ जूनच्या रात्री एक बिबट्या मादी आपल्या बछड्याला तोंडात घेवून रस्ता ओलांडत होती. मात्र या रस्त्यावरील वाहनाच्या वर्दळीमुळे बिबट्या मादीच्या तोंडातून बछडा खाली रस्त्यावर पडला. यामुळे आई व बछड्यांची ताटातूट झाली. घडलेल्या प्रकारांनतर वन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी जावून या बछड्याला ताब्यात घेतले. त्याची आरोग्य तपासणी केल्यावर तो तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. यानंतर या बछड्याच्या आईचा शोध घेण्यास वनविभागाच्या कर्मचा-यांनी सुरुवात केली. मात्र अद्याप या आई बछड्याची भेट होवू शकली नाही. रस्त्यावर सापडलेल्या या बिबट्याच्या बछड्याचे वय फक्त १५ दिवस असल्याने त्याची काळजी वन विभागाकडून घेण्यात येत आहे. त्याला दूध तसेच लिक्विड युक्त पदार्थ पाजण्यात येत आहेत. तसेच या बछड्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी सांगली येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी बोलावण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मादी बिबट्या रस्ता ओलांडत असताना कोणत्यातरी अज्ञात वाहनाची धडक बसल्याने हा बछडा तिच्या तोंडातून खाली पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनविभागाकडून या बछड्याला त्याची आई पुन्हा मिळावी, यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहे. रात्रीच्या वेळी ज्या ठिकाणी बछडा मिळाला त्याठिकाणी त्याला ठेवून आई व बछड्याची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.