कराड: राज्यातील महायुती बळकट असून, भाजपने दीड कोटी सदस्यसंख्या केली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारही त्यांची पक्षवाढ करत आहेत. त्यामुळे महायुती १५ वर्षे सत्तेतून हलवणार नाही तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढवणार असून, आमचा राज्यभर स्थानिक संस्थांवर कब्जा असेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना केला.

एकनाथ शिंदेंनी पुण्यात भगवा फडकवण्याचा तर, अजित पवारांनी तिरंगा फडकवणार असल्याचा दावा केल्याकडे लक्ष वेधले असता ‘महायुती’तील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ज्या ठिकाणी लढतील, तिथे ‘महायुती’तील इतर पक्ष त्यांना मदत करतील असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

फडणवीस हे शिंदेंचे घोटाळे बाहेर काढत असतील, तर त्यांचे स्वागत आहे या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदेंनी कोणताही घोटाळा केलेला नाही. आमचे सरकार पारदर्शी व गतिमान आहे. संजय राऊतांनी पाच वर्षे विरोधी पक्षात चांगले काम करावे, सरकारला चांगल्या भूमिका सांगाव्यात. महायुती भक्कम असल्याने राऊतांनी असे कितीही खडे टाकले, तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील जनता आणि भाजप त्यांच्या अशा बोलण्याला महत्त्व देत नसल्याचे बावनकुळे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांनी ‘शाडो कॅबिनेट’ तयार केले असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, या ‘शाडो कॅबिनेट’चा अभ्यास पहिल्यांदा उद्धव ठाकरे सरकारला करावा लागेल. ठाकरे सरकारच्या काळात जे कॅबिनेट होते, त्यावर ही ‘शाडो कॅबिनेट’ चांगले काम करेल, असा टोला लगावत आमचे सरकार एवढे पारदर्शक आहे की, कितीही ‘शाडो कॅबिनेट’ तयार केल्या तरी त्याचा काहीच उपयोग होणार नसल्याचा दावा बावनकुळे यांनी दिला.