प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) दिल्लीला होणार्या परेडमध्ये यंदा एनसीसीच्या पथकाचे प्रतिनिधित्व औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर मुगले करणार आहे. देशभरातील २ हजार विद्यार्थ्यांमधून अंतिम निवड झालेल्या १४८ विद्यार्थ्यांची तुकडी परेडसाठी सज्ज झाली आहे.
सागर मुगले ड्रील प्रकारात देशातून प्रथम आला आहे. धारदार आवाज आणि परेडमध्ये संघाला देण्यात येणाऱ्या कमांडच्या विशेष लकबीमुळे सागरची नेतृत्वासाठी निवड झाल्याचे त्याचे प्रशिक्षक लेफ्टनंट परशुराम माचेवार यांनी सांगितले. सागरने मागच्या वर्षीही या परेडसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. देशभरातील एनसीसी कॅडेट्सची एकदा तरी प्रजासत्ताकदिनी राजपथवर परेडमध्ये एनसीसीच्या पथकात सहभागी व्हायची इच्छा असते. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून १११ विद्यार्थी दिल्लीला गेले होते. त्यातून सागर निवडला गेला ही औरंगाबादसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे लेफ्ट. माचेवार म्हणाले.
देशाच्या सांस्कृतीचे आणि सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी औरंगाबादला प्राधान्य मिळाले. त्यामुळे या विषयाची शहरभर चर्चा आहे. सागर खंडू मूगले हा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वासडीचा असून देवगिरी महाविद्यालयात बी. ए. प्रथमवर्षाला शिकतो. औरंगाबादच्या महाविद्यालयात एनसीसी कॅडेटची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी त्यांना पौष्टिक आहार महाविद्यालयातर्फे दिला जातो. यासाठी लेफ्ट. परशुराम माचेवार यांनी एनसीसी कॅडेटकडे विशेष लक्ष दिल्याची भावना महाविद्यालयात व्यक्त होत आहे.
एसएलआर रायफलची प्रॅक्टीस करताना सागरने ११ रायफलचे मॅगझीन तोडले इतका सक्षम विद्यार्थी घडवला जाणे हे फार थोड्या प्रशिक्षकांना जमत असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य थोरे यांनी सांगितले.