सांगली : बहुमजली इमारतीला परवानगी देण्यासाठी सात लाखांची लाच मागणी केल्या प्रकरणी महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना सोमवारी लाचलुचपत विभागाने अटक केली. यामुळे महापालिकेत खळबळ उडाली असून, या कारवाईनंतर काही बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या आवारात फटाके फोडून आनंद साजरा केला.

शहरात २४ मजली इमारत बांधकामास पूर्व परवानगी घेण्यासाठी तक्रारदाराने रितसर महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी उपायुक्त साबळे यांनी दहा लाख रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तडजोडीअंती सात लाख रुपये लाच घेऊन परवानगी देण्याचे साबळे यांनी मान्य केले. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारदाराकडून ७ लाख रुपये लाच मागणी केल्याप्रकरणी साबळे यांना आज ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई उपअधीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात साबळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, साबळेंच्या अटकेची बातमी कळताच सांगली महापालिका विभागीय कार्यालय मंगलधामसमोर बांधकाम व्यावसायिकांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. यापूर्वी इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून बदली झाल्यावर सुद्धा फटाक्यांची आतषबाजी झाली होती.