सांगली : घरेलू कामगार महिला हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक निरोगी, सुदृढ राहण्यास आरोग्य तपासणी शिबिरातून मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केले.

सांगली जिल्हा प्रशासकीय गतिमानता घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मालू हायस्कूल येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, सांगली शहरच्या पोलीस उपअधीक्षक विमला एम., शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, सहायक आयुक्त, कामगार कल्याण मुजम्मिल मुजावर, सहायक धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

घरेलू कामगार हा इतरांची सेवा करणारा व त्या माध्यमातून अनेकांचे कुटुंब चालविणारा वर्ग आहे. मात्र, पैसे व वेळेअभावी घरेलू कामगार महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वर्गातील महिलांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून केली जात आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री पाटील म्हणाले, की घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अशा कामगारांची नोंदणी केली जाते. त्यांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. नोंदणी झालेल्या घरेलू कामगार महिलांची आजच्या शिबिरात आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर गरजेप्रमाणे मुख्यमंत्री सहायता कक्ष, आयुष्मान भारत, धर्मादाय रुग्णालय आदि माध्यमातून उपचार केले जाणार आहेत.प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. काकडे म्हणाले, की घरेलू कामगार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, त्या सर्वांचे आयुष्य त्यांच्या मुलांभोवती, कुटुंबाभोवती गुंफले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शिबिरात विविध तपासण्या होणार असून, तपासणी झालेल्या महिलांचे गंभीर आजार ते निरोगी अशा चार प्रकारात वर्गीकरण करून आवश्यकतेप्रमाणे आगामी चार महिने उपचार करण्यात येतील, स्वागत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी केले.