सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या जतमधील कारखान्याचा नामफलक काढून त्या ठिकाणी राजे विजयसिंह डफळे कारखाना असे नामकरण करण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री घडला असून, याप्रकरणी कारखान्याकडून जत पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वीच हा कारखाना सभासदांच्या मालकीचा झाल्याविना धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा दिला होता.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने दहा वर्षांपूर्वी जतमधील तिप्पेहळ्ळी येथे असलेला सहकारी साखर कारखाना राज्य शिखर बँकेच्या लिलावात खरेदी केला होता. गेल्या काही वर्षांपासून कारखान्याचे राजारामबापू सहकारी साखर कारखाना युनिट चार म्हणून या ठिकाणी गाळपही सुरू आहे.

मात्र, रात्री काही अज्ञातांनी प्रवेशद्वारावरील राजारामबापू सहकारी साखर कारखाना असे नाव असलेल्या फलकावर राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना असा फलक लावला. तसेच मूळ फलकावरील राजारामबापू या अक्षरांनाही काळे फासण्यात आले. फलकावरील नाव बदलण्यात आल्याचे समजताच कारखाना व्यवस्थापनाकडून तत्काळ नव्याने बसविण्यात आलेला फलक काढण्यात आला आहे.

राजारामबापू कारखान्याने राज्य शिखर बँकेच्या लिलावात हा कारखाना खरेदी केला असून, काहींनी खोडसाळपणा करून नामांतराचा प्रयत्न केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी सांगितले.

राजारामबापू कारखान्याने २०१२ मध्ये हा कारखाना राज्य शिखर बँकेच्या लिलावात ४७ कोटी ८६ लाख रुपयांना खरेदी केला असून, बंद कारखान्यात सुमारे अडीच कोटींची गुंतवणूक करून २०१३-१४ पासून या ठिकाणी गाळप सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, आमदार पडळकर यांनी, जत कारखाना आमदार जयंत पाटील यांनी बळकावला असून, जोपर्यंत तो सभासदांच्या मालकीचा होत नाही तोपर्यंत गाळप हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. या घटनेचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध केला असून, राजकीय लाभासाठीच हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप युवकचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी केला. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना सुरू राहणे महत्त्वाचे असल्याचे श्री. कोकरे यांनी सांगितले.