सांगली : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ शनिवारी आष्टा, इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने बंद पाळण्यात आला. आ. पडळकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. सांगली ते पेठ या मार्गावरील वाहतूक रास्ता रोको आंदोलनामुळे ठप्प झाली होती. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापटही झाली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
भाजपचे आमदार पडळकर यांनी जतमध्ये बोलताना आ. पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याचे तीव्र पडसाद गेले दोन दिवस उमटत असून, आज कार्यकर्त्यांनी आष्टा व इस्लामपूर येथे बंद आणि रास्ता रोको आंदोलन केले. कामेरी नाका येथे त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला व टायर पेटवून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी हस्तक्षेप करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरू झाली.
आज इस्लामपूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवावगळता अन्य व्यवहार बहुतांशी बंद होते. नेहमी गजबजलेला कचेरी चौकही आज मोकळा वाटत होता. आष्ट्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आ. पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात तालुकाध्यक्ष विजय पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, महिलाध्यक्षा सुनीता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, बँकेचे अध्यक्ष विजय यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, आनंदराव पाटील, युवक अध्यक्ष संग्राम जाधव, पुष्पलता खरात यांच्यासह विविध संस्थांचे संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आ. पडळकर यांनी आ. पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी दिली. शहरातील कर्मवीर चौकापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून, सांगता स्टेशन चौकातील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभेने होणार आहे. या निषेध मोर्चामध्ये खासदार सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे आदींसह पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेते सहभागी होणार आहेत.
