सांगली : पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोयना, चांदोलीसह विविध धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने सांगली शहरातील पूरपट्ट्यातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचा आदेश मंगळवारी जिल्हा प्रशासनाने दिला. नदीतील पाणीपातळी उद्या, बुधवारी सायंकाळपर्यंत ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह संभाव्य पूरबाधित भागाची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

गेल्या चार दिवसांपासून सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. कोयनेतून दुपारी तीन वाजल्यापासून ८० हजार ५०० क्युसेक आणि चांदोली धरणातून ३६ हजार ६३० क्युसेकचा विसर्ग अनुक्रमे कृष्णा आणि वारणा नदीत केला जात आहे. यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. सोमवारी सायंकाळी आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी १५ फूट सहा इंच होती, ती आज दुपारी २ वाजता २१ फुटांवर गेली असून, उद्या सकाळी ३० फूट व सायंकाळपर्यंत ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. धरणातून होत असलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस यामुळे सांगलीत पाण्याची पातळी ४५ फुटांपर्यंत जाऊ शकते, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

पाणी पातळी वाढली, तर सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्ता, शिवमंदिर परिसर, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी आदी रहिवासी क्षेत्रांतील घरात पाणी शिरणार आहे. यामुळे येथील रहिवाशांना स्थलांतर करण्याच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत, असे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले. संभाव्य पूरबाधित क्षेत्रात ४५० कुटुंबांचे वास्तव्य असून, त्यांच्यासाठी मार्केट यार्डातील कामगार भवन, रोटरी हॉल, माळी मंगल कार्यालय, सखी मंच आदी ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संभाव्य पूरबाधित क्षेत्राची पाहणी केली. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सर्व बाजूंनी सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, की महानगरपालिका, महसूल यंत्रणा, जलसंपदा विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस विभाग, तसेच आरोग्य विभागाकडून वेळोवेळी बाधितांना मदत देण्यात येईल. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २२.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे :- मिरज २२, जत १३.३, खानापूर-विटा १५.९, वाळवा-इस्लामपूर ३०.७, तासगाव १७.५, आटपाडी ११.५, कवठेमहांकाळ १३.१, पलूस १८.६ आणि कडेगाव १६.४.