छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील संतपीठाची अजूनही उपेक्षाच सुरू असून, २३ कोटींच्या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. मागील चार वर्षांपासून संतपीठाचे पालकत्व स्वीकारलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडूनच जेमतेम निधीतून आणि तोकड्या मनुष्यबळावर कामकाज सुरू आहे. या कालावधीत संतपीठातून महाराष्ट्रासह अमेरिका, इंग्लंड आदी देशांतूनही काही विद्यार्थी, उमेदवार प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत.
शिवसेना-भाजपच्या पहिल्या युती (१९९५) शासनाच्या कार्यकाळात पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती. त्याला मराठवाड्याच्या विकासाच्या ४२ कलमांतर्गतचा आधारही देण्यात आला होता. पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात १७ एकर जागाही देण्यात आली. मुला-मुलींच्या वसतिगृहांसह दोन मजली इमारतही उभी राहिली. दिवंगत बाळासाहेब भारदे समितीने अभ्यासक्रमाबाबतचा सविस्तर अहवालही दिला होता. परंतु प्रत्यक्षात अभ्यासक्रम तयार करण्यासह इतर बाबींसाठी दुसऱ्या महायुती शासनकाळात थोड्या-बहुत हालचाली झाल्या. आणि २०२१ साली प्रत्यक्षात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाले.
आज संतपीठातून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, वारकरी संप्रदाय व महानुभाव संप्रदायासह एकनाथ भागवत परिचय प्रमाणपत्र हे सहा महिन्यांच्या कालावधीतील पाच अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. यासाठी मराठी विद्यार्थ्यांसह अमेरिका, इंग्लंड आदी देशांतील भारतीय वंशाचे विद्यार्थीही प्रवेश घेत असून, मागील तीन-साडेतीन वर्षांत ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत. मात्र, संतपीठाच्या १७ एकर जागेत संत साहित्य, सांप्रदायिक तत्त्वज्ञान, संगीत अशी काही केंद्र उभारायचे बाकी आहे. त्यासाठी निधीची गरज आहे.
पैठण येथे २०२१ पासून सुरू झालेल्या संतपीठातील सर्व अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. देश-विदेशातील विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतला जात आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन पद्धत आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. संतपीठाच्या विस्ताराच्या दृष्टीने २३ कोटी १० लाखांचा आराखडा शासनाकडे दिलेला आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- प्रा. डाॅ. प्रवीण वक्ते, समन्वयक, संतपीठ