कराड : जुने- नवे अशी प्रतवारी न करता सरसकट आले खरेदीवर सर्वांचे एकमत असताना, काही संधिसाधू व्यापारी व दलाल प्रतवारीनुसार आले खरेदीचा घाट घालत आहेत. त्यांच्याकडून अडवणूक करून व आमिष दाखवून आले खरेदी सुरू असल्याने त्याविरोधात संघर्षाचे रान उठत आहे. यावर आता राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार हे आक्रमक झाले असून, प्रतवारीने आले खरेदी केल्यास सक्त कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.

सातारा जिल्ह्यात विशेषतः सातारा, कोरेगाव तालुक्यात आले पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असे. त्यात सातारा बाजार समिती हे आले खरेदीचे केंद्र बनले आहे. बाजारपेठेत दरवर्षी आले मागणी तेजीत राहिल्याने चढे दर आणि उत्पादनात नुकसानीचा धोका कमी असल्याने अन्यत्रही आले पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे.

हेही वाचा – आभासी जगातील प्रेमभंगातून युवतीची आत्महत्या, साताऱ्यातील घटनेत मैत्रिणीकडूनच फसवणूक

आले उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतोय म्हटल्यावर जुने- नवे अशा प्रतवारीनुसार आले खरेदीचे धोरण पुढे आणून व्यापारी व दलालांनी शेतकऱ्यांची लूट चालवल्याच्या तक्रारी पुढे आल्या. आणि आले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या प्रश्नावरून गेल्या दोन – चार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.

आले खरेदीच्या धोरणावर गरमागरम चर्चा होऊन सातारा, कोरेगावसह अनेक शेती उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची मागणी न्याय असल्याचे मान्य करीत सरसकट आले खरेदी करावी असे ठराव केले. व्यापारी, अडते व शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन हा सर्वमान्य तोडगा निघाल्याचे जाहीर केले आहे. राज्य शासनाने तसा निर्णय घेतला आहे. मात्र, काही खरेदीदार व्यापारी व दलालांनी शेतकऱ्यांची कोंडी करून, प्रतवारीनुसार आले खरेदीचा घाट घातला आहे. त्यात अडवणूक करून आणि आमिष दाखवून त्यांची आले खरेदी सुरू असल्याने त्याविरोधात तीव्र संघर्षाची ठिणगी पडली आहे.

हेही वाचा – जेव्हा जिल्हाधिकारीच व्यक्त करतात स्वतःच्या शासकीय बंगल्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित डाळिंब बाग निर्मितीची इच्छा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोरेगावच्या शेतकऱ्यांनी सहकार उपनिबंधकांना शेकडो निवेदने देऊन सक्त आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनासाठी बाजार समितीचे सभापती ॲड. पांडुरंग भोसले, किशोर गायकवाड, सुरेश जगदाळे, ॲड. सतीश कदम, किरण साळुंखे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याला अन्य ठिकाणच्या आले उत्पादकांचा उत्स्फूर्त पाठिंबाही मिळत आहे. ही सर्व परिस्थिती गांभीर्याने घेऊन आता राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रश्नी वैयक्तिक लक्ष घातले आहे. नुकतीच सिल्लोड येथे बैठक घेऊन प्रतवारी न करता आले खरेदी करा, अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा व्यापारी व दलालांना दिला आहे. त्यातून आले उत्पादकांना दिलासा मिळाला असला तरी त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होणार? हा कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी बाजार समित्यांनी कृती आराखडा बनवून जबाबदारी घेण्याची गरज आहे.