२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता. या शपथविधीबाबत अद्याप अनेक गूढ कायम आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना केली होती,” असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“शिवसेनेनं २०१९ मध्ये सरकार स्थापनेसाठी पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिला. यामुळे सत्तेवर कोण येणार? असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी शरद पवारांनी भाजपाशी संपर्क साधला आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपाने युती करावी, असं सुचवलं. तेव्हा शरद पवारांनीच राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सूचना केली होती. जेणेकरून राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना भाजपाशी युती करण्याबाबत माहिती मिळू शकेल. मात्र, सर्व वाटाघाटी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : “…म्हणून सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून येतात”, अजित पवार गटाच्या नेत्याचा टोला

“भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या”

यावर ‘इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह’मध्ये संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “आम्ही सत्तेत नव्हतो. भाजपा सत्तेत होता. त्यांच्याकडे जास्त आमदार होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय त्यांचाच होता. भाजपाकडे बहुमत होतं, तर त्यांनी मला का विचारालं? भाजपानं राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय का घेतला?”

हेही वाचा : अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवारांना सर्व बंधूंनी काय सांगितलं? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रश्न हाच आहे की…”

शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा सुरू होती, असा दावा फडणवीसांनी केला आहे. याबद्दल विचारल्यावर शरद पवारांनी म्हटलं, “ही चुकीची माहिती आहे. प्रश्न हाच आहे की, भाजपाकडे बहुमत असताना ते माझं का ऐकत होते?”