मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच वंचित बहुनज आघाडीच्या तिकीटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. मात्र त्यानंतर आता त्यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांचे स्वागत केले आणि मनसेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेत स्वगृही परतलेल्या सर्व बांधवाचे स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी वसंतराव काय करताय याकडे सर्वांचे लक्ष होते. काय करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. वसंत मोरे आधी शिवसैनिक होते. मधल्या काळात ते दुसऱ्या पक्षात गेले. इतर पक्षात सन्मान मिळतो का? काय वागणूक दिली जाते? याचा अनुभव घेऊन अधिक परिपक्व होत आता ते स्वगृही परतले आहेत.”

शिवसेना सोडल्याबद्दल तुम्हाला शिक्षा झाली पाहीजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये हशा पिकला. पूर्वीपेक्षा अधिक पटीने पुण्यात शिवसेना वाढली पाहीजे, अशी जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंना दिली. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, इतर पक्षातील अनुभव गाठीशी असल्यामुळे आज तुमचे महत्त्व, काम आणि जबाबदारी फार मोठी आहे. वसंत मोरे यांच्यासह मनसेचे १७ शाखाध्यक्ष आणि पाच विभाग अध्यक्ष उबाठा गटात आले आहेत.

शिवसेनेत कुठली जबाबदारी? वसंत मोरे म्हणाले, “उद्धव ठाकरे मला…”

लोकसभेत संविधानाचे रक्षण केले आणि आता…

“लोकसभा निवडणुकीच्या निकालातून महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखविली आहे. लोकसभेत संविधानाला वाचविण्याची लढाई आपण लढलो. आता विधानसभेत गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारीच्या विरोधात लढाई लढायची आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वाची ही लढाई आहे. पुणे हे सत्ताबदलाचे केंद्र असेल. त्यामुळे पुण्यात शिवसैनिकांनी आता बदल घडविण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. पुण्यात एकेकाळी शिवसेनेचे पाच आमदार होते, तो काळ मला पुन्हा आणायचा आहे”, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

वसंत मोरे काय म्हणाले?

दरम्यान शिवबंधन बांधून घेत असताना वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी १६ व्या वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. पण १८ वर्ष पूर्ण न झाल्यामुळे पद मिळाले नव्हते. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होताच १९९२ साली कात्रजमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो होतो. आज माझ्याबरोबर अनेक लोक शिवसेनेत येत आहेत. मी मूळचा शिवेसनेचा असल्यामुळे माझा आज प्रवेश नाही तर मी स्वगृही परतलो आहे”, असे वसंत मोरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसंत मोरे यांचे स्वागत करत असताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात पाऊसही सुरू आहे, त्यामुळे वसंत फुलला आहे. तात्याची (वसंत मोरे) सुरुवात शिवसेनेपासून झाली होते. त्यामुळे ते अधेमधे कुठेही गेले असले तरी शिवसेना आता त्यांचा शेवटचा स्टॉप आहे.