सातारा : सातारा जिल्ह्यातील नऊ पालिका आणि एक नगरपंचायत अशा दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ कार्यकारिणीची बैठकीनंतर निवडणूक प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे प्रभारी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक प्रमुख म्हणून धैर्यशील कदम यांची वर्णी लागली आहे.

सोलापूर शहर आणि सोलापूर पूर्वसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत तसेच नगराध्यक्ष पदांची संख्या सुद्धा भारतीय जनता पार्टीची जास्त असावी, या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे संघटन कामाला लागले आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्य कार्यकारिणीची बैठक होऊन त्या बैठकीद्वारे काही निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ग्रामविकास मंत्री भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापूर शहरसाठी रघुनाथ कुलकर्णी तर सोलापूर पूर्वसाठी राम सातपुते यांना निवडणूक प्रमुख नेमण्यात आले आहे.

कराड दक्षिण, कराड उत्तर, सातारा व माण विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे चार आमदार असल्यामुळे भाजपचा वरचष्मा कायम राहिला आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यांनी ऑपरेशन लोटस राबवत कराड व मलकापूर कार्यक्षेत्रात भाजपच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.

सातारा जिल्ह्याची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे देण्यात आल्यामुळे येथील राजकीय समीकरणे जुळवणे भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे, सहकारी आमदारांची समन्वय ठेवून संघटन बांधणी मजबूत करत जास्तीत जास्त मतदान बूथ भाजपचे राहतील या दृष्टीने निर्माण करणे, इत्यादी जबाबदाऱ्या प्रभारी आणि निवडणूक प्रमुखांना देण्यात आलेले आहेत.