कराड : पश्चिम घाटक्षेत्रातील पाऊस ओसरलेलाच असून, सर्वत्र श्रावणी ऊन- पावसाचा खेळ दिसत आहे. त्यात कोयना धरणातील जलआवक मंदावल्याने धरणाचे दोन फुटांवर असलेले सहा वक्री दरवाजे आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता बंद करण्यात आले. त्यामुळे आता धरणाच्या पायथा वीजगृहातून केवळ २,१०० क्युसेकचा जलविसर्ग ‘जैसे थे’ राहिला आहे.
पावसाचा जोर अगदीच ओसरल्याने खरीप पेरण्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोयना धरणाच्या दरवाजातून बंद करण्यात आलेल्या जलविसर्गामुळे कृष्णा-कोयना नद्यांची जलपातळी घटणार आहे. सध्या कोयना धरणातील जलआवक १९,५६८ क्युसेकवरून १३,०८२ क्युसेकपर्यंत खाली आली आहे. सातारा जिल्ह्यातील धोम, कण्हेर, तारळी, धोम-बलकवडी, उरमोडी धरणांतूनही कमी- अधिक प्रमाणात जलविसर्ग सुरूच आहे.
कोयनेच्या जलसाठ्यात २४ तासांत १.१३ टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची आवक होऊन तो ८६.३४ टीएमसी (८२.०३ टक्के) झाला आहे. तर, कोयना पाणलोटात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २४ तासांत २६ मिमी पाऊस झाला आहे. तर, यंदा आजवर सरासरी ३,३०४.६६ मिमी (एकूण वार्षिक सरासरीच्या ६६.०९ टक्के) पावसाची नोंद आहे.
शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोयना पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वरला ८, नवजाला १०, कोयनानगरला ५ मिमी, तर अन्य धरण क्षेत्रांत किरकोळ ते मध्यम पावसाचे चित्र आहे. मात्र, वाई तालुक्यातील जांभळी येथे ढगफुटीसदृश पाऊस होऊन त्याची १७४ मिमी (६.८५ इंच) अशी विक्रमी नोंद झाली आहे.
शेतकऱ्याचे नुकसान
सध्या जलसाठे भरून वाहिले, शेतशिवारात पाणीच पाणी अशा पाण्याच्या सुकाळाचे चित्र असले, तरी अतिपावसामुळे यंदाचा पावसाळा शेतकऱ्याचे कंबरडे मोडणारा ठरला आहे. प्रमाणापेक्षा जास्त पावसामुळे खरिपाचे उत्पन्न घटणार असल्याने हे उत्पादन महागणार असल्याने त्याची थेट झळ सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला बसणार आहे.
मान्सूनपूर्व आणि मोसमी पावसाच्या पहिल्या सत्रातील जोरदार पर्जन्यवृष्टीचा खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून, प्रत्येक तालुक्यातून व विभागातून ओल्या दुष्काळाची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पेरण्याच झालेल्या नसून, झालेल्या पेरण्यांमध्ये अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याचे दिसत आहे. खरीप पिकांची उगवण न होणे, पिके पिवळी पडणे, कमजोर होणे यामुळे जे काही उत्पादन मिळेल ते दर्जेदार मिळणार नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होताना, या शेतमालाचे दर भविष्यात चढे राहण्याची चिंता आहे.