गणेशोत्सवासाठी नियमित कोकण रेल्वे गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने अनेक कोकणवासियांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, त्यांच्या दिमतीला आता गोवा-मुंबई वंदे भारत एक्सस्प्रेस सज्ज झाली आहे. परंतु, ही रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरील रोहा, खेड, रत्नागिरी आणि कणवली या चारच स्थानकात थांबणार आहे. त्यामुळे इतर रेल्वे स्थानकात राहणाऱ्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, वर्दळीचे स्थानक असलेल्या कुडाळ रेल्वे स्थानकातही या रेल्वेचा थांबा न दिल्याने कुडाळकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, या संदर्भात आता कोकणातील माजी खासदार निलेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“माझे काही सहकारी वंदे भारत ट्रेन जी ३ जून पासून कोकणात धावणार आहे, त्या ट्रेनला कुडाळ स्टेशनसाठी थांबा मिळाला नाही याबद्दल निराश झाले. पण आपल्याला मी सांगू इच्छितो मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका महत्त्वाच्या रूटवर ट्रेन सुरू करते तेव्हा स्टेशनचा ग्रेड तपासते. मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनचं कसलंही अपग्रेडेशनचं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून कणकवली रेल्वे स्टेशन हेच जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणून बघितले जाते”, असं स्पष्टीकरण निलेश राणे यांनी दिलं आहे.

गणेशोत्सव काळात मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील चाकरमनी कोकणात जातात. कोकण रेल्वे हा त्यांच्यासाठी सोयीचा मार्ग आहे. मात्र, गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण खुले होताच सर्व तिकिटे क्षणार्धात आरक्षित झाली. त्यामुळे अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. तिकिट विक्रीत काळाबाजार झाला असल्याचीही शंका उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान, कोकण मार्गावर तेजस एक्स्प्रेसप्रमाणेच आता वंदे भारत ट्रेनही धावणार असल्याचे वृत्त आल्याने चाकरमान्यांनी निश्वास सोडला. मात्र, वंदे भारतला कोकणात अवघ्या चारच ठिकाणी थांबा देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राजापूर, कुडाळ आदी ठिकाणीही वंदे भारत ट्रेन थांबवावी अशी मागणी जोर धरत असल्याने निलेश राणे यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.

वंदे भारतचा दर किती?

  • मुंबई मडगाव चेअर कारसाठी १ हजार ७४५ रुपये
  • एक्झिक्युटिव्ह चेअरकारसाठी ३ हजार २९० रुपये

तेजचे एक्स्प्रेसचे दर किती

  • मुंबई मडगाव मार्गावर चेअर कारसाठी १ हजार ५५५ रुपये
  • एक्झिक्युटिव्ह चेअरकारसाठी ३ हजार ८० रुपये

तेजस एक्स्प्रेसचे थांबे किती?

पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ स्थानकात तेजस एक्स्प्रेसला थांबे देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.