सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात राहणाऱ्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज माध्यमांतून समोर आला आहे. मात्र ही घटना सासरच्या छळामुळे झाल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गाजत असताना त्यानंतर सोलापुरात हे आत्महत्या प्रकरण घडले आहे. विवाहिता तीन महिन्यांची गर्भवती होती. तिला दोन वर्षांची मुलगीही आहे. त्यांच्या नातेवाइकांनी सांगितल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींकडून त्यांना सातत्याने छळ सहन करावा लागत होता. चार ते पाच वेळा घरगुती वाद निर्माण झाल्यानंतर त्यांच्या माहेरच्या मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

ही आत्महत्या की पूर्वनियोजित हत्या याचा तपास वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पद्धतीने करण्यात यावा. घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करावा, अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांना दिल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, डॉ. गोऱ्हे यांनी आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे आणि जलदगतीने तपास करून न्याय दिला जावा, अशा स्पष्ट सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा संदर्भ देत, मृत विवाहितेची दोन वर्षांची मुलगी सध्या तिच्या आजोबा-आजींकडे म्हणजेच आईच्या माहेरी आहे. यावर प्रतिक्रिया देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या बाळासाठी न्यायालयीन आदेश घ्यावे लागेल का, की तिच्या माहेरची मंडळी स्वतः तिला सांभाळण्यासाठी तयार आहेत, याची माहिती घेऊन त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.