लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : शहरात सायंकाळी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र पाणी केले. मागील काही दिवसांपासून उघडीप घेतलेला पाऊस आज जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात अवकाळीसदृश बरसला. सातारा शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ठिकठिकाणी सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. शहरात बऱ्याच ठिकाणी गुडघाभर पाणी साचले.

जुलै महिन्याच्या आषाढ नक्षत्रात तब्बल तीन आठवडे जोरदार पाऊस झाल्याने कोयना धरण ९० टीएमसीवर पोहोचले आहे. पावसाने उघडीप घेतल्याचे दिसत असतानाच शनिवारी पुन्हा मुसळधार पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कराड, पाटण अशा बहुतांश भागांमध्ये सायंकाळी उशिरा जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. दुष्काळी माण, खटाव तालुक्यातही अनेक भागांत शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस आला होता. शनिवारी सायंकाळी सातारा शहरात पाऊस झाला. या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांचा रविवारी सातारा दौरा होत आहे. पावसामुळे विसावा नाका येथे वाऱ्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी लावलेले फलक रस्त्यावर कोसळले.

आणखी वाचा-सोलापुरात मघा नक्षत्राच्या सरी खरीप पिकांसाठी पोषक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात रस्त्यावरून पाण्याचे प्रचंड लोट वाहत होते तर सखल भागामध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे अशक्य झाले होते. सातारा शहरात सायंकाळी उशिरा मुसळधार पावसामुळे शहराच्या पश्चिम भागामध्ये वीज खंडित झाली होती. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सातारा शहराबरोबरच महाबळेश्वर, पाचगणी, वाई, भुईंज येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.