Suresh Dhas : डिसेंबर महिन्यात बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशनात निवेदन द्यावं लागलं. मंगळवारी म्हणजेच ७ जानेवारीला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतही कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. दरम्यान सुरेश धस यांनी आज अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट घेतली. सुरेश धस यांनी भेटी दरम्यान काय चर्चा झाली ते सांगितलं आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली का? या प्रश्नाचंही उत्तर त्यांनी दिलं आहे. या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. त्यानंतर त्याच्याविरोधातली प्रकरणं सुरेश धस समोर आणत आहे.

काय म्हणाले सुरेश धस?

वाल्मिक कराडच्या सगळ्या गँग मोक्कामध्ये गेल्या पाहिजेत अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. वाल्मिक कराडने लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवलं आहे. खाडे नावाच्या अधिकाऱ्याकडे दीड कोटी रुपये सापडले होते. त्याला वाल्मिक कराडने वाचवलं असा आरोप सुरेश धस यांनी केला. सुरेश धस यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर आरोप केले. तसंच मी येत्या दोन दिवसात या सगळ्यांची मालमत्ता किती आहे ते जाहीर करणार आहे असंही सुरेश धस म्हणाले.

हे पण वाचा- Suresh Dhas : “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, यांचा ‘तेरे नाम’ मधला सलमान…”; सुरेश धस यांची टीका

मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही-धस

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोळंकी यांनी राजीनाम्याची मागणी केली. मी आका आणि आकाचे आका म्हणत होतो. आका म्हणजे वाल्मिक कराड सगळ्यात आहे. वाल्मिक कराडची चौकशी झाली पाहिजे. खंडणीबाबत सातपुडा बंगल्यावर बैठक झाली हे मी आजही खात्रीने सांगतो. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा किंवा काय करायचं हे देवगिरीवर राहणाऱ्या अजित पवारांच्या हातात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फड, दिघोळे यांच्या कुटुंबाला मी भेटणार आहे-धस

मी किशोर फड, संगीत दिघोळे यांच्या मातोश्रींना आणि त्यांच्या पत्नींना भेटायला परळीला जाणार आहे. पाच वर्ष बीड जिल्ह्यांत काय चाललं आहे ते सगळ्यांना माहीत आहे. धनंजय मुंडे यांना सगळं माहीत आहे असंही सुरेश धस म्हणाले. आकांना त्यांच्या आकांनी पाठिंबाच दिला आहे असंही सुरेश धस म्हणाले. तसंच नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा का? असं विचारलं असता त्यांच्याकडे नैतिकताच शिल्लक नाही असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.