Thackeray Brothers : महापालिका निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले आहेत. ५ जुलैच्या संयुक्त मोर्चातही ते दिसणार आहेत. दरम्यान या सगळ्या घटनांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे. दोन्ही नेते एकत्र येत आहेत त्यांची युती कायम राहिल का? या प्रश्नावर या दोघांनी उत्तर दिलं आहे.

शिवसेना आणि मनसे या अशी युती होऊ शकते का?

एप्रिल महिन्यात राज ठाकरेंनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या हितासाठी मी सगळे मतभेद विसरु शकतो असं म्हणत टाळीची भाषा केली होती. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही त्याच दिवशी या टाळीला हाळी देत प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी दोन्ही मी सगळे मतभेद विसरायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर या चर्चा काहीशा थंडावल्या. पण जून महिन्यांत या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. आता तर ५ जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधात होणाऱ्या सरकार विरोधी मोर्चात राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर या दोघांनी ‘माझा कट्टा’ या एबीपी माझाच्या मुलाखतीत या दोघांचा हातात हात राहिल का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अनिल परब आणि बाळा नांदगावकर?

५ जुलैला ज्याची सुरुवात होणार आहे ते ठाकरे बंधू हातात हात घालून दिसतील. ते त्या दिवसापुरतं न राहता पुढे चालत राहतील अशी अपेक्षा ठेवायची का? हे विचारलं असता बाळा नांदगावकर म्हणाले, “मी आधीही सांगितलं आहे की एखादी चांगली घटना घडणार असेल तर त्याचं स्वागतच सगळ्यांनी केलं पाहिजे. त्याच्यात काही अडचण नाही. पण तो निर्णय दोन्ही पक्षाचे हायकमांड म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं घेतील.” तर अनिल परब म्हणाले, “मराठी माणसाच्या हिताची ही नक्की सुरुवात आहे. शिवाय हातातला हात त्या दिवशी चालताना समजेल. पण तो कायम राहिल का? याचा निर्णय हे दोन्ही नेते घेतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिसेंबरमध्ये २००५ मध्ये राज ठाकरेंनी सोडली शिवसेना

राज ठाकरे यांनी डिसेंबर २००५ मध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना हा पक्ष सोडला होता. त्यानंतर २००६ मध्ये त्यांनी मनसे हा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके अपवाद वगळले तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर कायम टीकाच केलेली दिसून आली आहे. २००९ ची निवडणूक, २०१४ ची निवडणूक, २०१२ आणि २०१७ च्या महापालिका निवडणुका यामध्ये या दोघांचे एकमेकांवरचे शाब्दिक प्रहार महाराष्ट्राने पाहिले आहेत. तसंच २०१९ मध्ये आणि २०२४ मध्येही राज ठाकरेंच्या भूमिका या उद्धव ठाकरेंना साजेशा नव्हत्या. त्यामुळे हे दोघं आता २०२५ मध्ये एकत्र येणार का? मागच्या १९ वर्षांमध्ये जे काही घडलं आहे ते सगळं विसरणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण याबाबत काय जो निर्णय आहे तो निर्णय हे दोन नेतेच घेऊ शकतात असं त्यांच्या पक्षांमधल्या दोन दिग्गज नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात नव्या युतीची नांदी दिसणार का? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे.