Who is Dr. Balaji Tambe : वरळी येथे आयोजित केलेल्या पादुकादर्शन सोहळ्यात संतांच्या यादीत डॉ. बालाजी तांबे यांचा समावेश करण्यात आल्याने वारकरी संप्रदायाने नाराजी व्यक्त केली आहे. संतांच्या यादीत तांबे यांचा समावेश कसा होऊ शकतो, असा प्रश्न वारकरी संप्रदायाकडून विचारला जात आहे. दरम्यान, यानिमित्तानं बालाजी तांबे नेमके कोण? त्यांचं कार्य काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ…
बालाजी तांबे यांना आयुर्वेदाचार्य म्हणून ओळखलं जात असे. तब्बल पाच दशकं त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचाराचा प्रचार व प्रसार केला. बालाजी तांबेंचं आयुर्वेदातील कार्य फक्त स्थानिक, राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न राहता, आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या उपचारपद्धतींना मानणारा एक मोठा वर्ग होता. राजकारण ते समाजकारण आणि उद्योगजगत ते सिनेविश्व अशा सर्वच क्षेत्रांमध्ये बालाजी तांबे यांचा मित्रपरिवारही होता. पण, आयुर्वेदाचार्य या स्थानापर्यंत पोहोचण्याआधी बालाजी तांबे यांनीदेखील लहानपणी कठोर मेहनत घेतल्याचं त्यांचा भूतकाळ सांगतो.
बालाजी तांबे आयुर्वेदाकडे कसे वळले?
बालाजी तांबे यांचा २८ जून १९४० मध्ये जन्म झाला. बालाजी तांबे यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचं नाव वासुदेव तांबे शास्त्री, असं आहे. आयुर्वेदाचार्य म्हणून कार्य करण्यामागे बालाजी तांबे यांच्या वडिलांचा मोठा हातभार आहे. त्याबाबत त्यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, “माझ्या बाबांचं ३६ व्या वर्षी लग्न झालं. तोपर्यंत ते बेडाघाटला एका गुरूंजवळ राहायचे. तिथे ते शास्त्र, योग, शक्तिपात शिकायला गेले होते. तेव्हा त्यांना गुरूंनी सांगितलं, “तू घरी जा, लग्न कर आणि तुझा पहिला मुलगा या कार्यासाठी मला झोळीत दे. त्यामुळे बाबाही मला लहानपणी म्हणायचे की तुला हे असं काम करायचं आहे. मलाही उपजत काही समज होतीच.”
बालाजी तांबे लहानपणी बाजारात विकायचे वस्तू
दरम्यान, आपल्या लहानपणीची आठवण सांगताना बालाजी तांबे म्हणाले, “आमच्या इथे मोठं भाजी मार्केट असायचं. ज्या दिवशी मला वेळ असेल किंवा शाळा नसेल अशा सुटीच्या दिवशी मी पोत्यावर दुकान टाकून, त्या भाजी मार्केटमध्ये बसायचो. पोमेड, साबण विकायचो. एका एजन्सीकडून आम्ही वस्तू विकण्याचं काम घेतलं होतं. रविवारी त्याच वस्तू गळ्यात ट्रे अडकवून रस्तोरस्ती विकायचो”.
आयुर्वेद आणि इंजिनीयरची पदवी एकाच वर्षात
बालाजी तांबे यांना लहानपणापासून वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. तसेच, बडोद्यात बालाजी तांबे यांच्या शेजारी काही वैद्य राहायचे. त्यांच्याकडून बालाजी तांबे नाडीचं मार्गदर्शन आणि औषधीकरण या दोन गोष्टी शिकले होते. दरम्यान, बालाजी तांबे यांनी अभियांत्रिकीचेही शिक्षण घेतले होते. त्यांनी आयुर्वेदातील पदवी आणि यांत्रिक अभियंत्याची पदवी एकाच वर्षी प्राप्त केली होती. उपजिविकेसाठी त्यांनी यांत्रिक अभियंता होण्याचा निर्णय घेतला होता. यांत्रिक अभियंत्याचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी आयुर्वेदाचाही अभ्यास सुरू ठेवला होता.
बाळासाहेबांशी असलेलं नातं
सेवा करत असताना त्यांनी सुरुवातीला येणाऱ्या रुग्णांसाठी एमटीडीसीचे बंगले भाड्याने घेतले होते. १९८९ पर्यंत ते एमटीडीसीच्या बंगल्यात राहिले. याविषयीही त्यांनी एक किस्सा सांगितला होता. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, एमटीडीसीच्या बंगल्यात राहत असताना एकदा बाळासाहेब ठाकरे बंगल्यात राहायला आले होते. त्यावेळी त्यांना सर्वत्र अस्वच्छता दिसली. याबाबत बाळासाहेब ठाकरेंनी बालाजी तांबे यांना विचारलं असता, त्यांनीच या अस्वच्छतेबाबत बाळासाहेबांकडे तक्रार केली. त्यांची तक्रार ऐकताच बाळासाहेबांनी एक काठी हातात घेतली अन् फर्मान सोडलं. बोलवा रे त्या सगळ्यांना म्हणत… बाळासाहेबांचा हा पवित्रा पाहून बालाजी तांबेंनी विचारलं, “बाळासाहेब, तुमची युनियन आहे का इथे?” त्यावर बाळासाहेब उत्तरले, “माझी युनियन नाही; पण मी दाखवतो युनियनशिवाय कशी कामं होतात ते!” एवढं बोलून बाळासाहेबांनी तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. त्यांना दरडावलं, की लगेच सगळीकडे स्वच्छता करा, रोपं लावा. मी जाईपर्यंत इथे सगळं हिरवं दिसलं नाही, तर या काठीनं एकेकाला दाखवतो!
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत बालाजी तांबेंचा असा दिग्गज मित्रपरिवार होता. अखेर १० ऑगस्ट २०२१ रोजी त्यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्याच्या खासगी रुग्णालयात निधन झालं. तर, २०२२ मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला.
बालाजी तांबेंविरोधात यापूर्वी तक्रार
‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकाच्या माध्यमातून पुत्रप्राप्तीचा प्रचार करून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी अहिल्यानगर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुस्तकाचे लेखक बालाजी तांबे, प्रकाशक आणि विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या अहवालानंतर बालाजी तांबे यांच्यावर पुत्रप्राप्तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
संतांच्या यादीत बालाजी तांबेंचं नाव कशाला?
भक्ती-शक्ती व्यासपीठ आणि श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव यांच्या वतीने वरळी येथे दोन दिवसीय संत आणि योगी पुरुषांच्या मूळ पादुकादर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर (नेवासा), संत तुकाराम (भंडारा डोंगर), संत मुक्ताई (मुक्ताईनगर), संत नामदेव (घुमान, पंजाब), संत जनाबाई (गंगाखेड), संत रामदास, संत गजानन महाराज, संत गोंदवलेकर महाराज यांच्याबरोबरीने डॉ. बालाजी तांबे यांच्या पादुकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत वारकरी संप्रदायातून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.