News Flash

चव, ज्याची त्याची

तिने आज हा विषय आईकडे काढला. ती आईला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या आमटीचं कौतुक किती लोक करतात.    

मोहन गद्रे gadrekaka@gmail.com

तिने आज हा विषय आईकडे काढला. ती आईला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या आमटीचं कौतुक किती लोक करतात. आमच्याकडे तर जेवताना हा विषय बरेच वेळा निघतो. मी विचार केला, असं कसं होईल? का मला तुझ्यासारखी आमटी जमू नये? तंतोतंत तुझ्या कृतीप्रमाणे सर्व पार पाडले की तशीच चव यायलाच पाहिजे; पण नाही ती चव येत. का असं होतं गं?’’

गेला आठवडाभर राजश्री आपल्या आईकडे राहायला आली होती. सुबोध आठवडाभरासाठी ऑॅफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता. सुबोध म्हणजे राजश्रीचा नवरा. सासू-सासरे एका ट्रॅव्हल कंपनीतर्फे टुरवर गेले होते. आईकडे आल्या आल्या राजश्रीने जाहीर करून टाकले होते, रात्रीचे जेवण ती करणार. आई, बाबा आणि लहान भाऊ, थोडक्यात चौघांचा स्वयंपाक ती आल्यापासून रोज करायची.

सासरीदेखील रात्रीचा स्वयंपाक तीच करायची. तिला एका गोष्टीची फार खंत वाटायची, का कोणास ठाऊक तिच्या आईसारखी आमटी मात्र काही केल्या जमायची नाही. राजश्रीच्या सासरीदेखील तिच्या आईची आमटी सर्वाना आवडायची. आपल्या आईसारखीच आमटी आपल्यालाही जमायला हवी, अशी राजश्रीची फार इच्छा होती. त्यासाठी तिने बरेच प्रयत्न करून पाहिले. आमटी करण्याच्या किती तरी वेगवेगळ्या पद्धती तिने अजमावून पाहिल्या. फोन करून आईचा सल्ला घेऊन आमटी करून पाहिली; परंतु छे! ती चव नाहीच.

आईसारखीच आमटी बनविण्याच्या प्रयत्न तिने ज्या दिवसापासून सुरू केला होता त्या दिवसापासून तिने एका वहीत आमटी कशी केली त्याबद्दल अगदी बारीकसारीक माहिती त्यात उतरवून ठेवली होती. वापरलेल्या प्रत्येक वस्तूचे प्रमाण काटेकोरपणे नोंदवून ठेवले होते आणि एक दिवस मात्र सगळं कसं छान जमलं. तिची आई बनवायची अगदी तशीच आमटी त्या दिवशी जमून आली होती. ज्या दिवशी तिला तिच्या आईसारखीच चविष्ट आमटी बनविता आली, अगदी तशीच

तंतोतंत कृती आणि आमटीसाठी लागणारे सर्व घटक पदार्थ वापरून दुसऱ्या दिवशी तिने आमटी केली; परंतु कालची चव मात्र आलीच नाही. ती बराच वेळ विचार करत बसली, असं कसं झालं? कुठे चूक झाली. तीच आणि तितकीच डाळ, बाकी मसाले तेच आणि तितकेच, सर्व कृती मोजमाप अगदी सर्व कालच्यासारखे घेऊनही ती चव नाहीच. का बरं असं व्हावं?

तिने आज हा विषय आईकडे काढला. ती आईला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या आमटीचं कौतुक किती लोक करतात.      आमच्याकडे तर जेवताना हा विषय बरेच वेळा निघतो. मी विचार केला असं कसं होईल? का मला तुझ्यासारखी आमटी जमू नये? तंतोतंत तुझ्या कृतीप्रमाणे सर्व पार पाडले की तशीच चव यायलाच पाहिजे; पण नाही ती चव येत. का असं

होतं गं?’’

आई म्हणाली, ‘‘तू मला फोनवर विचारत ज्या दिवशी आमटी करत होतीस त्याच दिवशी मी तुला सांगणार होते असे विचारून, ठरवून, मारून मुटकून कुठलाही पदार्थ आपल्या मनासारखा होत नसतो. मी विचार केला, तुला अनुभवांनी ते समजून येऊ दे. तुझ्या सासुबाईंच्या पोळ्या अतिशय सुरेख होतात. मला त्यांच्यासारख्याच पोळ्या कराव्यात असे वाटतेही, परंतु तुझ्या सासुबाई माझ्यासारखी आमटी त्यांना बनवता येत नाही म्हणून मनाला लावून घेत नाहीत आणि मी त्यांच्यासारख्या पोळ्या मला जमत नाहीत म्हणून दु:ख करत बसत नाही, कारण आम्हाला दोघींनाही अनुभवाने हे समजून चुकले आहे की, पदार्थाला असणारी चव, ही ज्याची त्याची खासियत असते. अगं, तुझ्यासारखी शेवयांची खीर मला कुठे जमते?’’

‘‘एक लक्षात ठेव, यापुढे कोणासारखा हुबेहूब पदार्थ करण्याच्या प्रयत्न करूनकोस. तुझा स्वयंपाक तुझाच असला पाहिजे. आपल्याला आईसारखी आमटी जमत नाही या चिंतेत आणि तशी करण्याच्या अट्टहासापायी तुझा बाकीचा स्वयंपाक बेचव होतोय याची तुला कल्पना आहे का? काल आम्ही दोघं अर्ध्या जेवणावरून उठलो. आम्ही कारण दुसरेच सांगितले, परंतु काल तुझा सगळाच स्वयंपाक बेचव झाला होता.’’

दुसऱ्या दिवशी बाबा जेवताना म्हणाले, ‘‘राजश्री, आज जेवण एकदम फक्कड, शेवयांची खीर एकदम जमल्ये बरं का!’’

राजश्रीचा स्वयंपाक त्या दिवशीपासून तिच्या हातच्या चवीचा झाला.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2018 1:01 am

Web Title: tasty cooking from rajashree hand
Next Stories
1 बदलते नातेसंबंध
2 संवाद
3 एका कथेची गोष्ट!
Just Now!
X