06 July 2020

News Flash

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमा विभागात यंदा १० मराठी चित्रपट

भारत सरकारतर्फे गोव्यात आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या ४५व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात ‘इफ्फी’ महोत्सवातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात एकाच वेळी सात

| November 18, 2014 04:24 am

भारत सरकारतर्फे गोव्यात आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या ४५व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात ‘इफ्फी’ महोत्सवातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात एकाच वेळी सात मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. आतापर्यंत पॅनोरमामध्ये एखाददुसरा मराठी चित्रपट झळकत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत व्यावसायिक यश साध्य करणाऱ्या मराठी चित्रपटांनी आपल्या आशयाचा दर्जाही सतत उंचावता ठेवला असल्याने, एकाच वेळी सात मराठी चित्रपट ‘इफ्फी’मध्ये मराठीचा गजर करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर इंडियन पॅनोरमा विभागातील नॉन फिचर या विभागांतर्गत तीन मराठी चित्रपट निवडण्यात आले आहेत.
इफ्फीच्या पॅनोरमा विभागात यावर्षी एलिझाबेथ एकादशी, डॉ. प्रकाश बाबा आमटे, किल्ला, लोकमान्य, एक हजाराची नोट, यलो आणि ए रेनी डे असे सात मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. पॅनोरमाची सुरुवात ही नेहमी श्याम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन यांच्यासारख्या दिग्गजांच्या चित्रपटांनी होत असे. यंदा पहिल्यांदाच पॅनोरमाचा शुभारंभ एलिझाबेथ एकादशी या परेश मोकाशी दिग्दर्शित मराठी चित्रपटाने होणार असल्याची माहिती एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी यांनी दिली.
पॅनोरमासाठी निवडण्यात आलेल्या सात चित्रपटांपैकी चार चित्रपट हे एस्सेल व्हिजनचे आहेत. यातले डॉ. प्रकाश बाबा आमटे, एलिझाबेथ एकादशी हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर अविनाश अरुण दिग्दर्शित किल्ला आणि ओम राऊत दिग्दर्शित लोकमान्य हे दोन चित्रपट प्रदर्शित व्हायचे आहेत. ‘गेली कित्येक वर्षे पॅनोरमामध्ये झळकणाऱ्या मराठी चित्रपटांचे प्रमाण अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्याइतके होते. याआधी एनएफडीसीमध्ये काम करीत असताना पॅनोरमामध्ये येणाऱ्या चित्रपटांमध्ये मल्याळम, बंगाली आणि अन्य प्रादेशिक चित्रपटांची संख्या नेहमी जास्त असायची. तिथून ते आज एकाच वेळी सात मराठी चित्रपट पॅनोरमामध्ये प्रदर्शित होणे हे खरोखरीच मराठी चित्रपटांनी मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे, अशी भावना केणी यांनी व्यक्त केली. पॅनोरमामध्ये या सात मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच त्यावर खुली चर्चा, दिग्दर्शक – निर्मात्यांचा फिल्मबाजारमधला सहभाग यावरही भर देण्यात आला आहे. इफ्फीच्या आयोजकांनी पहिल्यांदाच आम्हाला समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. त्यानिमित्ताने महोत्सवातील देशी-विदेशी चित्रपटांच्या प्रतिनिधींना या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांची ओळख करून देण्यात येणार असल्याचेही नितीन केणी यांनी सांगितले.
इंडियन पॅनोरमा विभागातील फिचर फिल्म्स या गटामध्ये सात मराठी चित्रपट असून नॉन-फिचर गटामध्ये रवी जाधव दिग्दर्शित ‘मित्रा’, विजू गोपाळ माने दिग्दर्शित ‘एक होता काऊ’ आणि प्रसन्न श्रीकांत पोण्डे दिग्दर्शित ‘विठय़ा’ हे लघुपट निवडण्यात आले आहेत.
‘इफ्फी’ महोत्सवाचा प्रारंभ २० नोव्हेंबरपासून होत असून २१ नोव्हेंबरला इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्घाटन ‘एलिझाबेथ एकादशी’च्या खेळाने होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2014 4:24 am

Web Title: 10 marathi movie in panorama section of iffi
टॅग Entertainment
Next Stories
1 डिझायनर मसाबा गुप्ता आणि व्हिव रिचर्ड्स स्पोर्ट्सवेअर कलेक्शनसाठी एकत्र
2 साहित्य अकादमीचा ‘ग्रंथ जागर’
3 महेश भट्ट यांच्या हत्येचा कट उधळला
Just Now!
X