ऑस्कर पारितोषिक विजेता संगीतकार ए. आर रहमान यांनी रजनीकांत यांच्या ‘कोचादैयान’ चित्रपटाला संगीत दिले असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या आर. अश्विन हिने केले आहे. ‘मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी’चा वापर करून बनविण्यात आलेला हा देशातील पहिलाच चित्रपट आहे. ‘मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी’च्या वापराने एका नवीन चित्रपटसृष्टीच्या निर्माणाचे भाकीत संगीतकार रहमान यांनी वर्तविले. ‘कोचादैयान’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात बोलताना ते म्हणाले, ज्याप्रमाणे हॉलिवूड, बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी आहे, त्याचप्रमाणे ‘मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी’चा वापर करून बनविण्यात आलेल्या चित्रपटांची संपूर्णपणे एक वेगळी चित्रपटसृष्टी निर्माण होऊ शकते. सदर चित्रपटाच्या निर्मितीसाठी सौंदर्याने घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख करत, चित्रपटाच्या यशाची आपल्याला खात्री असल्याचे देखील ते म्हणाले. मी अमेरिकेवरून चेन्नईला परतलो, त्यावेळी सौंदर्याने मला या चित्रपटाविषयी सांगितले, त्याचप्रमाणे हा चित्रपट वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे देखील तिने सांगितले. हे सर्व कसे होणार या विषयी मला आश्चर्य वाटत असल्याने निर्णय कळवायला मी एक आठवड्याचा अवधी घेतला. दरम्यानच्या काळात मला रजनीसरांचा फोन आला आणि या चित्रपटासाठी घेण्यात येणाऱ्या परिश्रमाची मला जाणीव झाली. त्यानंतर हा चित्रपट स्विकारल्याचे रहमान म्हणाले.
मोशन किंवा परफॉर्मन्स कॅप्चर तंत्रज्ञान चित्रपटकर्त्यांना अभिनेत्याच्या हालचाली रेकॉर्ड करण्यासाठी मदत करते. यासाठी अभिनेत्याला एक स्पेशल सुट परिधान करावा लागतो जो अभिनेत्याचे हावभाव आणि हलचाली कॅप्चर करून अॅनिमेशनमध्ये परावर्तित करतो.