गेल्या वर्षी ‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमधून अभिनेता सैफ अली खानने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. ‘सेक्रेड गेम्स’मधील सैफच्या इमानदार पोलिस ऑफिसर सरताज सिंगच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली होती. आता या सीरिजच्या दुसऱ्या सिझनविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सैफने त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’मधील भूमिकेबद्दल आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या याचा खुलासा केला आहे.

‘सेक्रेड गेम्स’ प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी फोन केल्याचा खुलासा सैफने मुलाखतीमध्ये केला. यामध्ये अभिनेता आमिर खान आणि वरुण धवनदेखील सामिल आहेत. ‘आमिर खानने मला मेसेज केला होता आणि त्याला या सीरिजविषयी बोलायचे असल्याचे त्याने सांगितले. आमिर खानच्या मताचा मी नेहमी आदर करतो. त्यामुळे मी लगेच त्याला फोन केला. आमिरने मला विचारले हा त्रिवेदी कोण आहे? त्याच्यासोबत पुढे काय होते? सीरिजमध्ये त्याचा मृत्यू होतो का? आमिरकडे असे अनेक प्रश्न होते आणि त्यांची उत्तरे मी देऊ शकत नव्हतो’ असे सैफ अली खान म्हणाला.

‘सेक्रेड गेम्स २’च्या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. नुकताच या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ‘भगवान को मानते हो, पर कभी सोचा है की भगवान किसको मानता है’, असे म्हणणाऱ्या गायतोंडेच्या या वाक्यामध्ये अनेक गोष्टींचा अर्थ दडलेला आहे.

‘सेक्रेड गेम्स२’ मध्ये गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कहाणी आणखी नवी वळणे घेणार आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे यासारखे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संवाद आणि दृश्याने भरलेली ही वेब सीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती प्रसिद्धही झाली होती. आता ‘सेक्रेड गेम्स २’ येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे.