अभिनेता अजय देवगणच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांची भूमिका असल्याने गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. आलोक नाथ यांच्यावर #MeToo (मीटू) मोहिमेअंतर्गत निर्माती विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. बलात्कारसारखा गंभीर आरोप असलेल्या आलोक नाथ यांना चित्रपटात भूमिका देण्यावरून अभिनेत्री तनुश्री दत्ताने अजयवर टीका केली होती. या संपूर्ण प्रकरणावर अखेर अजयने मौन सोडलं आहे.
‘‘मीटू’ मोहिम सुरु झाली, तेव्हा मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. मी महिलांचा प्रचंड आदर करतो. महिलांशी गैरवर्तन करणा-यांना आमचा विरोध आहे आणि असेल. आजही या मुद्यावर माझी तीच भूमिका आहे, जी आधी होती,’ असं अजयने स्पष्ट केलं. त्यासोबतच आलोक नाथ यांची भूमिका बदलणं किंवा त्यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन पुन्हा शूटिंग करणं खूप जास्त खर्चिक झालं असतं, असं त्याने म्हटलं.
‘दे दे प्यार दे या चित्रपटाची शूटिंग सप्टेंबर २०१८ मध्ये संपली आणि आलोक नाथ यांनी चित्रपटातील त्यांच्या भागाचं शूटिंग ऑगस्टमध्ये मनाली इथं पूर्ण केलं होतं. जवळपास १० अभिनेत्यांच्या टीमसह सलग ४० दिवस ही शूटिंग सुरू होती. जेव्हा ऑक्टोबर २०१८मध्ये ‘मीटू’ मोहिमेला सुरुवात झाली आणि आलोक नाथ यांच्यावर आरोप झाले तोपर्यंत आम्ही दुसऱ्या चित्रपटांमध्ये काम करू लागलो होतो. पुन्हा सर्वांच्या तारखा जुळवून ४० दिवस संपूर्ण टीमसह बाहेर शूट करणं अशक्य होतं. त्याचप्रमाणे हे खूप जास्त खर्चिक होतं. चित्रपटाचा बजेट दुप्पट झाला असता या खर्चाबाबत निर्णय घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य निर्मात्यांना आहे,’ असं तो पुढे म्हणाला.
‘खोट्या, दिखावा करणाऱ्या आणि ढोंगी लोकांनी सिनेसृष्टी भरलेली आहे. एका बलात्कारी पुरुषाला निर्मात्यांनी चित्रपटात स्थान दिलं. ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत आलोक नाथ त्यात आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं. अजय देवगण आणि निर्मात्यांना त्यांची भूमिका बदलण्याची संधी होती,’ अशी टीका तनुश्रीने केली होती.
गेल्या वर्षी आलोक नाथ यांच्यावर निर्माती विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर बी-टाऊनमधील काही कलाकार पुढे येत आलोक नाथ यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 19, 2019 11:59 am