‘इनसाइड एड’ ही वेब सीरिज चाहत्यांच्या कायमच लक्षात राहणारी ठरली होती. अॅमेझॉन प्राईमवर आलेल्या या वेब सीरिजनं सर्वांची वाहवा तर मिळवलीच होती, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरही अॅमी अवॉर्ड्समध्ये आपली छाप सोडली होती. क्रिकेटमधील स्पॉट फिक्सिंगसारख्या प्रकरणावर ही वेब सिरीज आधारित होती. स्पॉट फिक्सिंग, पॉलिटिक्स, पैसा, सेक्स, ड्रग्स, पावर गेम आणि क्रिकेट या सर्वांचा योग्य ताळमेळ यात बसवण्यात आला होता. परंतु मॅच फिक्सिंगभोवतीच ‘इनसाइड एज’ची कथा फिरत होती. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘इनसाइड एज’चा दुसरा सिजन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतान अॅमेझॉननं या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिजनचा ट्रेलर लॉन्च केला आहे. आकाश भाटियानं याचं दिग्दर्शन केलं आहे. ६ डिसेंबर रोजी या वेब सीरिजचा दुसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई मॅवरिक्स नावाच्या एका क्रिकेट टिमच्या भोवती ‘इनसाइड एड’ची कहाणी फिरते. या संघाचा मालकी हक्क झरीना मलिक (रिचा चड्ढा) हिच्याकडे दाखवण्यात आला आहे. पण नावाजलेल्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचा मालक विक्रांत धवन (विवेक ओबेरॉय) हा त्या टीमचे शेअर विकत घेतो आणि त्या टीमचा मालक बनतो. परंतु त्याचा मूळ उद्देश हा क्रिकेटला पुढं नेणं नाही तर संघाद्वारे पैसे कमवणं हाच असतो. यामुळे तो या टीमच्या अनेक प्लेअर्सना आपल्याकडे ओढून त्याद्वारे मॅच फिक्सिंगसारखा प्रकार घडवतो. अरविंद वशिष्ट (अंगद बेदी) हा मॅवरिक्स टीमचा कॅप्टन दाखवण्यात आला होता. तर वायू राघवन (तनूज विरवानी) हा त्या संघाचा प्रमुख बॅट्समन दाखवण्यात आला आहे. या दोघांनाही संघ जेव्हा गोत्यात जातोय असं वाटतं त्यावेळी हे दोघं झरीना मलिकच्या मदतीने विक्रांतला संपवण्याचा प्रयत्न करतात. तर झरीनाही विक्रांतला मारण्याचा प्रयत्न करते. याच ठिकाणी पहिल्या सिजनचा शेवट करण्यात आला होता. परंतु अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिले होते. त्याची उत्तरं आता दुसऱ्या सिजनच्या माध्यमातून मिळणार आहेत.

प्रेक्षकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या ट्रेलच्या माध्यमातून मिळत आहेत. या ट्रेलमध्ये विक्रांत पुन्हा आल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर मुंबई मॅवरिक्सची टीमही स्ट्रगल करताना दिसत आहे. त्या टीमच्या कॅप्टननं हरयाणा हरिकेन्स नावाचा संघ जॉईन केल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर मॅवरिक्सच्या टीमची धुरा वायू राघवनच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दोघंही आपल्या टीमला जिंकवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवूनच मैदानात उतरना दाखवण्यात आलं आहे. मॅच फिक्सिंगची जागा यावेळी ड्रग्सनं घेतल्याचंही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आपल्या टीमनं पॉईंट्स टेबलमध्ये टॉपला रहावं यासाठी टिमचा मालक आपल्या खेळाडूंना ड्रग्स घेण्याचा सल्लाही देतो. परंतु या सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे अखेरिस विक्रांत जीवंत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या सीजनमध्ये प्रेक्षकांना पुन्हा एका या वेब सीरिजच्या निमित्तानं काहीतरी नवं पहायला मिळण्याची शक्यता आहे.