झी युवावर , शौर्य – गाथा अभिमानाची , हा महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारा नवीन कार्यक्रम २५ नोव्हेंबर ला सुरु होत आहे . हा कार्यक्रम दर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९ वाजता वेगवेगळ्या गाजलेल्या शौर्य कथांसह पाहायला मिळेल. अशा या अनोख्या कार्यक्रमानिमित्त , या कार्यक्रमातील एका अॅन्थम सॉन्गचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा गायक आदर्श शिंदे याने हे गाणे स्वरबद्द केले आहे आणि याचे संगीत दिग्दर्शन अतिशय प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी केले आहे. आदर्शचे छोट्या पडद्यावरील हे पहिलेच गाणे असून शौर्यच्या अॅन्थम सॉन्गसाठी जेव्हा मी विचार केला तेव्हा आदर्श शिंदे हे एकमेव नाव माझ्यासमोर होते असे अमितराज यांनी सांगितले. आजपर्यंत या दोघांची जोडी ही नेहमीच हीट जोडी मानली जाते आणि या पुढेही ही परंपरा ते कायम ठेवतील याची या दोघांनाही खात्री आहे.

मराठी सिनेसृष्टी आणि छोटा पडदा या दोन्ही माध्यमांवर अशा प्रकारचे अॅन्थम सॉन्ग बनण्याची हि पहिलीच वेळ आहे. हे गीत अतिशय प्रेरणादायी असून त्याचे संगीत सुद्धा तेवढेच प्रभावी आणि यूथफूल आहे. हे गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र पोलिसांच्या अभिमानाचे स्फुरण चढेल याची या दोघांनाही खात्री आहे.

झी युवा ही नवीन मराठी वाहिनी, आजच्या पिढीची आवड लक्षात घेऊन, अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार असे कार्यक्रम प्रेक्षकांना देत आहे. याच यशस्वी मार्गावर चालत, झी युवा “शौर्य – गाथा अभिमानाची ” या मालिकेद्वारे, सर्वच प्रेक्षकांच्या मनातला, निधड्या छातीचा पोलीस, पुन्हा एकदा अत्यंत गर्वाने उभा करीत आहे. महाराष्ट्र पोलिसांचे अकल्पनीय शौर्य, पोलिसांच्याच दृष्टीने आणि त्यांच्याच मदतीने सांगितले जाणार आहे. या मालिकांमध्ये हाताळलेले संवेदनशील विषय, सामान्य नागरिकांच्या नजरेसमोर जसेच्या तसे उभे करण्यासाठी, आता त्या घटनांचे खरेखुरे साक्षीदारच, त्या घटना तेव्हा कश्या घडल्या? तेव्हाची नाजूक परिस्थिति कशी होती? तेव्हाच्या पोलीस अधिकाऱयांची मानसिकता काय होती?… या आणि अशा अनेक गोष्टींची गाथा अत्यंत अभिमानाने झी युवावर सांगतील.