छोट्या पडद्यावरुन करिअरची सुरुवात करणारा अभिनेता अमित साध सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर कलाविश्वातील घराणेशाही, गटबाजी, फेव्हरिझम हे मुद्दे चांगलेच चर्चिले जात आहेत. यात अमित साधनेदेखील त्याला आलेले अनुभव आणि स्ट्रगल काळातील काही आठवणी शेअर केल्या आहेत. यात फुटपाथवर जीवन जगताना अनेक गोष्टी शिकलो असं त्याने ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

“जीवनात घडणाऱ्या कोणत्याच गोष्टींचा मनावर परिणाम करुन घ्यायचा नसतो. जेव्हा तुम्ही हालाखीचं जीवन जगत असता तेव्हा सहाजिकच वाईट वाटत असतं. पण जेव्हा यशस्वी होता तेव्हा आनंदात असता.परंतु जेव्हा सगळं सुख तुम्हाल मिळत असतं तेव्हा हुरळून जाता कामा नये किंवा त्याचा गर्वदेखील करायला नको”, असं अमित म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “मला वाटतं प्रत्येक जण आयुष्यात कोणता ना कोणता संघर्ष करतच असतो. आयुष्यात मानसिक, भावनिक, अध्यात्मिक आणि आर्थिक अशा प्रत्येक टप्प्यावर जीवन बदलत असतं. पण मला असं वाटतं मी फुटपाथवर काढलेल्या त्या दिवसांनी मला खूप काही शिकवलं आहे. त्यामुळे आजही माझे विचार तसेच आहेत. मी फुटपाथशी जोडलो गेलो आहे जर मी कधी सुपरस्टार झालो तरीदेखील माझे विचार हे तसंच साधे असतील. माझं नात कायम जमिनीशी जोडलेलं असेल”.

दरम्यान, अमित साध छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असून त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच त्याचे ओटीटीवर चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाली. ‘शकुंतला देवी’, ‘यारा’ या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे.