संपूर्ण जगभरामध्ये डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव आजही मोठ्या आदराने घेतलं जातं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन, समाजाचा रोष पत्करुन आनंदीबाईंनी शिक्षण घेतलं आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आपल्या पत्नीला शिकविण्यासाठी गोपाळरावांनी केलेली धडपड आणि आनंदीबाईंनी निश्चयाने गाठलेलं ध्येय प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. ‘ज्या देशास माझा धर्म मान्य नाही, तो देश मला मान्य नाही’, असं म्हणत आनंदीबाईंनी आपला धर्म न बदला शिक्षण पूर्ण केलं. मात्र या प्रवासामध्ये त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. परंतु त्यांनी या साऱ्यावर मात करुन आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे ही कथा म्हणजे ‘सामान्य जोडप्याची, असामान्य गोष्ट’ असल्याचं या ट्रेलरमधून दिसून येत आहे.

आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या आयुष्यावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ या बायोपिकमध्ये अभिनेता ललित प्रभाकर गोपाळ जोशी यांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आनंदीबाईंची भूमिका साकारणार आहे.

आनंदीबाई म्हणजे महाराष्ट्रानं देशातल्या प्रत्येक महिलेला दिलेली देगणी आहे असं म्हणत झी स्टुडिओनं या चित्रपटाची घोषणा केली. १५ फेब्रुवारीला आनंदीबाईचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.