आपल्या गाण्यात महात्मा गांधीजींचं नाव घेणं एका गायिकेला चांगलंच महागात पडलं. झारखंडची राजधानी रांची येथे झालेल्या एका कार्यक्रमात अश्लील गाण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप भोजपुरी गायिका अंतरा सिंह प्रियांकावर आहे. याप्रकरणी तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. छोटानागपूर खादी ग्राम उद्योगनं याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती.

अंतरा सिंह प्रियांकाने गायलेलं हे गाणं केवळ अश्लील नसून त्यात गांधीजींच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याची तक्रार त्यांनी केली. प्रियांकाने देशाच्या महापुरुषाचा अपमान केल्याचं तक्रारकर्त्यांनी म्हटलं आहे. भोजपुरी इंडस्ट्रीत प्रियांका चांगलीच प्रसिद्ध आहे. बहुतांश हिट भोजपुरी गाणी तिनेच गायली आहेत. आता या तक्रारीनंतर ती अडचणीत सापडली आहे.

गेल्या काही दिवसांत ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हे गाणं चांगलंच गाजलं. या गाण्यामुळे प्रियांका फार चर्चेत होती. उर्दूमधील प्रसिदध शायर राहत इंदौरी यांचा शेर ‘बुलाती हैं मगर जाने का नहीं’चं साँग व्हर्जन सगळीकडे खूप व्हायरल झालं होतं. या शायरीवर भोजपुरी गायिकांनी गाणं गायलं होतं. ज्याला खूपच लोकप्रियता मिळाली होती.