‘महाभारत’ ही आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय पैराणिक गाथा आहे. पुस्तकं, मालिका, अॅनिमेटेड सीरिज यांसारख्या माध्यमातून ही गाथा आजवर रसिकांपर्यंत पोहोचली आहे. आता ही महागाथा ऑडिओ फॉर्मच्या माध्यमातून भेटीस आली आहे. प्रसिद्ध साहित्यिक देवदत्त पटनायक यांनी त्यांच्या शब्दात महाभारत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑडिबल सुनो या अॅपवर महाभारताचा हा ऑडिओ वर्जन प्रदर्शित झाला आहे. जवळपास सहा तासांची ही ऑडिओ क्लिप आहे. जबरदस्त डबिंग आणि विशेष ऑडिओ इफेक्टने भरलेली ही क्लिप १८ भागांमध्ये विभागली गेली आहे. या क्लिपमध्ये महाभारताच्या मुख्य कथेशिवाय आणखी काही लहान मोठ्या रंजक गोष्टी देखील सांगण्यात आल्या आहेत. शिवाय युद्ध संपल्यानंतर पांडव आणि श्री कृष्ण यांच्यासोबत काय घडलं याबाबतही या क्लिपमध्ये सांगण्यात आलं आहे.
देवदत्त पटनायक एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी आजवर ‘जया’, ‘द इंडियन मायथॉलॉजी’, ‘रामायण’, ‘सेव्हन सिक्रेट ऑफ विष्णू’, ‘माय हनुमान चालिसा’ यांसारखी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. पौराणिक विषयांचे अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन या आपल्या नव्या प्रयोगाबाबत रसिकांना माहिती दिली. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.