– चैतन्य ताह्मणे
३० एप्रिल २०२१ हा एक विशेष दिवस होता. या दिवशी ‘द डिसाइपल’ जगभरात ‘नेटफ्लिक्स’वर झळकला. हा चित्रपट ज्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल, अशांपैकी महाराष्ट्रीय लोकांसमवेत तो शेअर करताना आम्हाला सर्वात जास्त आनंद होत आहे. मुंबई, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातील हजारो लोकांच्या निःस्वार्थी व सामूहिक सहभागाशिवाय हा चित्रपट बनविता आला नसता.
माझा जन्म मुंबईचा. बालपणही इथलेच. मी इतर कोठेही ‘द डिसाइपल’ बनविण्याचा विचार केला नसता; कारण हे शहर स्वतःच या चित्रपटातील एक पात्र आहे. मी नेहमीच माझ्या चित्रपटांकडे सामाजिक प्रकल्प म्हणून पाहिले आहे. एखादे वातावरण, एखादी विशिष्ट संस्कृती आणि जगण्यातील अस्सल अनुभव दर्शविण्याचा प्रयत्न करताना आपल्याला संपूर्ण समाजाची मदत घ्यावी लागते. चित्रपटातील एखादा अगदी छोटा भागही वास्तविक जगाचा भाग असल्यासारखे आम्हाला दाखवायचे होते. त्या दृष्टीने चित्रपटातील संगीत सभेला उपस्थित असलेला प्रेक्षकही आम्हाला जाणकार आणि दर्दीच हवा होता. साहजिकच, खऱ्या जाणकारांनाच चित्रपटात भूमिका देण्याची गरज होती. राज्यातील असंख्य शास्त्रीय संगीतकारांव्यतिरिक्त मुंबई आणि आसपासच्या भागातील शेकडो बँक कर्मचारी, वकील, शिक्षक, रेल्वे कामगार आणि संगीतातील आवड असणारे असे अनेकजण ‘ऑडिशन’साठी पुढे आले. आम्ही चित्रीकरणास सुरवात केली, तेव्हा त्यापैकी बर्याच जणांनी आपापल्या कार्यालयांमध्ये अनेक दिवसांची रजा घेतली आणि मैफिलीच्या दृश्यांचे अस्सल वातावरण निर्माण करण्यात, मैफिलींसाठी योग्य जागा शोधण्यात मदत केली; तसेच शहरात चित्रीकरण करायचे असेल, त्यावेळी त्यांनी रस्ते, महामार्ग मोकळे करून देण्याचीही कामे उत्साहाने केली. रात्र असो वा दिवस, त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. हा आपला चित्रपट असल्याची त्यांची भावना इतकी उत्कट होती, की माझ्या भोवतालचे सामाजिक वातावरण आणि माझे शहर यांच्याबद्दलच्या कथा मी सांगू शकेन आणि तरीही जागतिक प्रेक्षकवर्गापर्यंत मी पोहोचू शकेन, याचा मला खूप मोठा आत्मविश्वास त्यातून मिळाला. भौगोलिक सीमा आणि भाषा यांचे अडथळे ओलांडून जगभरातील प्रेक्षकांनी ‘द डिसाइपल’चे जंगी स्वागत केले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा आनंद सोहळा माझ्या एकट्याच्या किंवा चित्रपटासाठी काम केलेल्यांच्या मालकीचा नाही, तर शहरातील त्या सर्व अदृश्य नायकांचा आहे, ज्यांनी आम्हाला या प्रयत्नात यश दिले.
‘द डिसाइपल’ हा तथाकथित ‘प्रादेशिक’ मराठी चित्रपट आहे. ‘कोर्ट’नंतर माझा पुढचा चित्रपट हिंदीमध्ये येणार का, अशी अनेकांनी विचारणा केली होती; जणू काही मराठी ही पहिली पायरी असावी किंवा पहिल्या चित्रपटात ती लंगडी पडली असावी! आम्ही ‘द डिसाइपल’ मराठीत बनविला, कारण या चित्रपटाच्या बर्याच पात्रांसाठी मराठी ही योग्य भाषा होती. चित्रपटात असे काही भाग आहेत, ज्यात पात्रांसाठी किंवा त्यातील परिस्थितीसाठी वेगळ्या भाषेची गरज निर्माण झाली; तेथे आपल्याला हिंदी, इंग्रजी व बंगाली भाषेतील संवाद आढळतील. ‘अॅकेडमी पारितोषिक’विजेते चित्रपट निर्माते अल्फोन्सो क्वारन यांना मी माझे गुरू मानतो. त्यांनी एकदा मला सांगितले होते, की सिनेमा ही एक वैश्विक भाषा आहे. ‘द डिसाइपल’बरोबरच्या माझ्या अनुभवाने मलाही याची खात्री पटली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे जग सांस्कृतिकदृष्ट्या विशिष्ट व गुंतागुंतीचे असू शकते; परंतु एखाद्या कलाकाराला स्वतःबद्दल शंका असणे किंवा पालकांनी स्वत:च्या महत्वाकांक्षा मुलांवर लादणे या बाबी वैश्विकच आहेत. म्हणूनच कदाचित हा चित्रपट दादरच्या चाळींमध्ये आणि पार्ले व गिरगावच्या गल्ल्यांमध्ये प्रवास घडवीत असला, तरीही विविध खंडांतील लोकांना तो आपला वाटतो.
हा चित्रपट शक्य व्हावा म्हणून गेल्या पाच वर्षांत ज्यांनी प्रचंड कष्ट घेतले, त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. अर्थात, प्रेक्षकांच्या मनाशी भिडल्याशिवाय चित्रपट कधीही पूर्ण होत नाही. आता आमच्या कष्टाचे हे फळ जगासमोर मांडले जात असताना, या चित्रपटातील सांस्कृतिक वैशिष्ट्ये, बारकावे आणि जटिलता यांचे कौतुक करू शकतील, अशांपर्यंत तो पोहोचावा, अशी माझी इच्छा आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रेक्षकवर्गापेक्षा हा लक्ष्यित प्रेक्षकच मला महत्त्वाचा वाटतो.
सध्याच्या कठीण परिस्थितीत, माणसाला थोडा आराम, काही दिलासा देऊन त्याला एक समाज म्हणून जवळ आणण्याचे काम कला करीत राहील, अशी मी प्रामाणिकपणे आशा व्यक्त करतो.