‘चार भांडी एकत्र आली, तर त्यांच्यामध्ये आवाज होणारच..’ अशा वेळी चार भिन्न प्रवृत्तीची माणसं एका घरात एकत्र आली तर काय होईल? याचा अनुभव सध्या ‘नच बलिये’च्या नव्या पर्वामध्ये येत आहे. यंदाच्या पर्वाची सूत्रं साक्षात एकता कपूर यांनी आपल्या हातात घेतल्यानंतर आधी केवळ जोडप्यांच्या नृत्यावर आधारित या रिअ‍ॅलिटी शोचं रूप पालटलं. शो सुरू होण्यापूर्वीच हा शो केवळ नृत्यकौशल्य नाही तर स्पर्धक जोडप्यांच्या नात्याचीही परीक्षा घेणारा असल्याचं स्पष्ट क रण्यात आलं. त्यामुळे सध्या या जोडय़ांना एका घरामध्ये एकत्र राहून विविध प्रसंगांना सामोरं जात आपलं नातं कसं आहे हे सिद्ध करावं लागतं आहे. साहजिकपणे या घरातच सर्वाधिक नाटय़ रंगत असल्याचं या घरामध्ये एक दिवस घालवल्यावर लक्षात येतं.

 नृत्याची कोरिओग्राफी कितीही किचकट असली तरी काहीच वाटत नाही. पण रोज वेगवेगळ्या टास्कना सामोरं जायचं, हे एक अग्निदिव्य असल्याचं सर्वजण मान्य करतात. अर्थात, शोमध्ये भाग घेताना त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती असं नाही. त्यावेळी मजा म्हणून हे स्वीकारल्यावर आता त्याच्या गंभीरतेची जाणीव त्यांना होते आहे. ‘प्रेक्षकांना पडद्यावर बघताना लक्षात येत नाही. पण दिवसभर सराव करून थकल्यावर आम्हाला बिछान्यावर झोपावंसं वाटतं तेव्हाच नेमकं आम्हाला चेहऱ्यावर मेकअप लावून, खोटं हसू आणून हे टास्क करावे लागतात’. हे खूप थकवणारं असल्याचं ऐश्वर्या टंडन सांगते. सतत प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्याची सवय असलेल्या या अकरा जोडप्यांचा जगाशी असलेला संबंध पूर्णपणे तोडून टाकण्यात आला आहे. त्यात एकमेकांसोबत राहात असल्याने त्यांच्यात स्पर्धा आहेच. त्याला फोडणी देत त्यांच्यात भांडणं लावून देण्याचाही प्रयत्न केला जातो आहे. एकाच छाताखाली राहताना एकमेकांविषयी मत्सर, भांडणं सुरूच होती. आज मित्र असलेले दोघं उद्या परस्परविरोधात उभे राहात होते. कालपर्यंत एकमेकांना भाऊ-बहीण मानणारे समोरच्यावर छेडछाडीचा आरोप लावू लागले. हे सर्व होत असताना कॅमेऱ्यासमोर आपण खरे असल्याची धडपडही एका बाजूला होती. थोडक्यात एकाच वेळी वेगवेगळ्या दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न या स्पर्धकांना करावा लागतो आहे.

शोच्या सुरुवातीपासून प्रत्येक जोडीची प्रेक्षकांसमोर विशिष्ट ओळख निर्माण करण्यात आली. ती ओळख टिकवून ठेवण्यासाठी पडद्यावरही त्यांना तसंच दाखवलं गेलं. अमृता खानविलकरचा खटय़ाळपणा, संग्राम सिंगचं गावठीपण, रोहित नागचं बालिश वागणं हे टीआरपीला फायदेशीर आहे. हे करण्याच्या प्रयत्नात कित्येकदा एकाच गोष्टीच्या भिन्न बाजू वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न होतो, हेही जोडय़ा मान्य करतात. ‘टी-शर्ट ओळखण्याच्या स्पर्धेत मी आणि रश्मीने लबाडी केल्याचं टीव्हीवर दाखवलं गेलं. पण खरं तर त्यावेळी माझं आणि उपेनच्या टी-शर्टची अदलाबदली झाली होती. हे मी दाखवूनही टीव्हीवर अर्धसत्य दाखवलं गेल्याचं नंदिश सांगतो. या सर्व घटनांमुळे त्यांच्यातील भांडणं आता विकोपाला गेली आहेत हे त्यांच्या घरात गेल्यावर लगेचच जाणवतं. घरातला एखादा छोटासा टास्क करण्यासाठीही त्या सर्वाना एकत्र आणणं, हे मोठं आव्हान असतं. सुरुवातीच्या काळात कठीण टास्क घेण्याचा प्रयत्न झाला. पण अर्पित रांका, नंदिशसारख्यांच्या अतिरेकी वागण्यामुळे या टास्कचे स्वरूप सोपं करण्यात आल्याचं प्रेक्षकांच्या नजरेतून निसटलं नाही. ‘एकीकडे ही इथे आमचीच स्पर्धा आमच्यासोबत असल्याचं’ मान्य करत असताना जोडय़ांमध्ये एकमेकांबद्दल असुरक्षितता ही आहेच, हेही इथे जाणवतं.

 पहिल्या पर्वाचे विजेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकरनंतर कोणतेही मराठी जोडपे दिसले नाही. त्यामुळे यंदा अमृता खानविलकर आणि मृणाल ठाकूरच्या प्रवेशामुळे तमाम मराठीजनांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. शोच्या सुरुवातीपासून मराठी चित्रपटक्षेत्रातून आल्यामुळे अमृता आणि मृणाल एकमेकींच्या जवळ होत्या. पण एका टास्कला मृणालने अमृताच्या खाजगी आयुष्यात वाजवीपेक्षा जास्त शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोघांच्या संबंधांमध्ये दुरावा आला. हा दुरावा इतका होता की मृणाल शोमधून बाहेर पडल्यावर अमृताला तिला निरोप देण्याचीही गरज भासली नाही. अशा सर्व घटना पडद्यामागे घडत असतानाही कॅमेऱ्यासमोर एकमेकांमध्ये सारं काही आलबेल असल्याचंही आम्हाला दाखवावं लागतं, असं हे स्पर्धक सांगतात.

घरात कितीही भांडणं असली तरी रिअ‍ॅलिटी शोच्या या संघर्षांमुळे पती-पत्नी म्हणून एकमेकांना आणखी समजून घेण्याची संधी या शोने दिल्याचेही ते मान्य करतात. ‘अकरा र्वष एकत्र असूनही काही गोष्टी एकमेकांना बोलून दाखवण्याची संधी मिळाली नव्हती. ती संधी या शोमध्ये मिळाल्याचे अमृता खानविलकर सांगते. एकमेकांच्या स्वभावातील काही आवडणाऱ्या आणि खटकणाऱ्या गोष्टी एरवी मुद्दाम कोणाला सांगता येणार नाहीत. ते या शोमुळे सहजी घडून आल्याचं सर्वच मान्य करतात. रश्मी-नंदीशच्या नात्यातील दुराव्यानंतर या शोने त्यांना एकमेकांना नव्याने शोधण्याची संधी दिली. मृणालबरोबरच्या नात्याला शरद त्रिपाठीच्या घरच्यांकडून विरोध असतानाही एकमेकांच्या पाठीशी ठाम उभं राहणं, जय सोनीची त्याच्या बायकोसाठी असलेली निष्ठा या नात्याच्या बाजूही या शोच्या माध्यामातून समोर आल्या. आता शो अंतिम टप्प्यात पोहचला आहे. त्यामुळे आता हे कधी संपेल, याची वाट पाहणाऱ्या जोडप्यांसाठीही हे नच सोप्पं नव्हतं हे खरं..