महाराष्ट्रातला करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत याबद्दलची माहिती दिली. या नव्या निर्बंधांमुळे मनोरंजन विश्वालाही काही बंधनं आली आहेत. चित्रपट, मालिका आणि जाहिरातींच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. पण तरीही मालिकांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

संचारबंदी असली तरी प्रेक्षकांना मात्र काही मालिकांचे नवे भाग पाहता येणार आहेत. याचं कारण असं की, काही मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. ‘इमली’ आणि ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकांचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरु आहे तर ‘पंड्या स्टोर’ या शोचं चित्रीकरण बिकानेरमध्ये सुरु आहे. ‘ससुराल सिमर का २’ ही मालिका आग्रा येथे चित्रीत होत आहे. त्यामुळे या मालिकांच्या चित्रीकरणावर महाराष्ट्रातले निर्बंध लागू होणार नसल्याने यांचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शन्स आणि निर्माता राजन शाही यांच्या मालिकांच्या चित्रीकऱणाबद्दल अद्याप कोणती माहिती उपलब्ध नाही.

महाराष्ट्रात पुढचे १५ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा-सुविधांवर बंदी घालण्यात आली आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. या निर्बंधांमुळे सेटवर सर्व खबरदारी घेणाऱ्या प्रोजेक्ट्सच्या चित्रीकरणावरही परिणाम झाला आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’, शाहरुख खानचा ‘पठाण’, सलमान खानचा ‘टायगर ३’ या बिग बजेट चित्रपटांनाही या नव्या निर्बंधांचाही फटका बसणार आहे. याप्रकरणी चित्रपट आणि टीव्ही निर्मात्यांच्या संघटनेच्या (IFTPC) टीव्ही आणि वेब विभागाचे अध्यक्ष आणि अभिनेते जे. डी. मजेठिया यांनी सांगितलं, “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो पण आम्ही मुख्यमंत्र्यांना या निर्णयाचा पुनर्विचार करण्याविषयी सुचवणार आहोत”. मजेठिया पुढे म्हणाले, “चित्रपट आणि टीव्ही कलाकार हे काही फ्रंटलाईन वर्कर्सपेक्षा कमी नाही. अशा कठीण काळातही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.”

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ‘रामसेतू’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘मिस्टर लेले’ अशा चित्रपटांचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. अभिनेता अक्षय कुमार, विकी कौशल, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, भूमी पेडणेकर या कलाकारांना करोनाची लागण झाली होती. अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ या चित्रपटाच्या टीमपैकी ४५ कलाकारांना करोनाची लागण झाली होती.