अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नियामक मंडळाच्या बुधवारच्या बैठकीत वाद निर्माण झाला. तब्बल नऊ महिन्यांनी झालेल्या या बैठकीत कार्यकारिणीने मांडलेले अनेक प्रस्ताव सदस्यांकडून फेटाळण्यात आले. तसेच अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडत, त्यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती नियामक सदस्य योगेश सोमण यांनी दिली.

करोनामुळे गेले नऊ महिने रखडलेली नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक बुधवारी यशवंत नाटय़मंदिर येथे झाली. परिषदेने करोनाकाळात रंगकर्मीना एक कोटी २० लाखांचा निधी देताना नियामक मंडळीची परवानगी घेतली नाही, विश्वस्त मंडळाच्या चार जागा रिक्त ठेवल्या, ९८ व्या नाटय़ संमेलनाच्या जमा खर्चाबाबत निविदा प्रक्रिया राबवली नाही, असे विविध आरोप नियामक मंडळातील सदस्यांनी केले.

याबाबतच्या तक्रारींचे पत्र यापूर्वीच विश्वस्तांना देण्यात आले होते. त्यांनतर परिषदेलाही जाब विचारण्यात आला होता. बुधवारी नियामक मंडळाच्या बैठकीत हे मुद्दे समोर आले.

योगेश सोमण, सुशांत शेलार, सुनिल महाजन, मुकुंद पटवर्धन, विजय कदम, सतीश लोटके, सुनिल ढगे यांसह उपस्थित २४ जणांनी कार्यकारिणीच्या कारभाराला विरोध केला.

नाराजी अशी..

* ‘आजवर नियामक मंडळाला कधीही विचारत घेतले गेले नाही. कायम एककल्ली आणि अरेरावीची भूमिका प्रसाद कांबळी यांनी घेतली आहे. आम्हाला विचारात घेणे तर दूर पण निर्णयही कळवले जात नव्हते. त्यामुळे अविश्वास निर्माण झाला आहे.’ अशी नाराजी योगेश सोमण यांनी व्यक्त केली आहे.

* सभेच्या शेवटी प्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला. तसेच कार्यकारिणी बरखास्त करण्याचीही मागणी करण्यात आली. आता १५ दिवसांनी विशेष बैठकीचे आयोजन करून पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे.

या मागण्या परिषदेच्या घटनेला धरून नाहीत. शिवाय कोणतेही पुरावे त्यांनी सादर केले नाही. सदस्यांनी दिलेल्या पत्रातही अध्यक्षांच्या राजीनाम्याची किंवा कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी कुठेही नमूद नाही.

– प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद