गेली ५० वर्षे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, प्रशिक्षक या नात्याने मराठी रंगभूमीवर दिलेल्या योगदानाच्या निमित्ताने २४ आणि २५ जानेवारी रोजी सुरेश खरे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भवन्स कॉलेज संकुल येथे हा सत्कार सोहळा होणार आहे.
२४ जानेवारी रोजी खरे यांनी लिहिलेल्या ‘काचेचा चंद्र’, ‘मला उत्तर हवंय’, ‘सखी शेजारणी’ आदी गाजलेल्या नाटकातील काही भागाचे अभिवाचन अभिनेते शरद पोंक्षे, प्रदीप वेलणकर, श्रीरंग देशमुख, अजित भुरे तसेच अभिनेत्री अश्विनी एकबोटे, रजनी वेलणकर, मधुरा वेलणकर, सीमा देशमुख, तेजा काटदरे करणार आहेत. त्यानंतर सुरेश खरे यांची संकल्पना आणि संहिता असलेली ‘गाणी मनातली, गळ्यातली’ ही संगीत मैफल होणार आहे.
अजित परब व तनुजा जोग गाणी सादर करणार आहेत. २५ जानेवारी रोजी सुरेश खरे लिखित दूरदर्शनवरून सादर झालेल्या ‘गजरा’ या कार्यक्रमातील तसेच खरे यांनी सूत्रसंचालन केलेल्या ‘नाटय़ावलोकन’ या कार्यक्रमातील काही भागांची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर खरे यांचा सत्कार होणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अनुराधा भागवत, सोनिया खरे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. सत्कार सोहळ्यानंतर सुरेश खरे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून मधुवंती सप्रे खरे यांच्याशी संवाद साधणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहेत.