News Flash

“सॅटर्डे  संडे” ची पहिली झलक अनुराग कश्यपच्या हस्ते 

'सॅटर्डे संडे' चित्रपटाची पहिली झलक हिंदीतील ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या हस्ते नुकतीच एका समारंभात दाखविण्यात आली.

| July 7, 2014 08:49 am

हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये गुन्हेगारी विषयांवर अनेक वास्तववादी, प्रभावी सिनेमांची निर्मिती झाली असली तरी मराठीत मात्र अपवादानेच असे विषय हाताळण्यात आले आहेत. मकरंद देशपांडे दिग्दर्शित आगामी ‘सॅटर्डे संडे’ या मराठीतल्या पहिल्या गँगस्टर चित्रपटामुळे ही कसर भरून निघण्याची शक्यता आहे. ‘अश्विनी राहुल इंटरप्रायजेस’ निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘सॅटर्डे संडे’ चित्रपटाची पहिली झलक हिंदीतील ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या हस्ते नुकतीच एका समारंभात दाखविण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्ध निर्माता विपूल अमृतलाल शहा यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘सॅटर्डे संडे’चा फर्स्ट लूक हिंदीच्या तोडीचा असून चित्रपटाचे संगीत देखील उत्तम झाले असल्याचे कौतुक दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यावेळी केले. विपुल शहा यांनी देखील चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँचचा हा कार्यक्रम खूपच देखणा आणि छान झाला असून चित्रपटाच्या टीमला मनापासून शुभेच्छा दिल्या. मकरंद देशपांडे यांनी यावेळी बोलतांना अनुराग कश्यप व विपूल शहा यांच्याशी नाट्यचळवळीपासून असलेली मैत्री, एकत्र केलेल्या स्ट्रगलच्या आठवणींना उजाळा देत दोन्ही दिग्गजांनी मिळवलेलं यश कौतुकास्पद असून त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.    

अंडरवर्ल्डला असलेला छुपा पाठिंबा, त्यापासून अनभिज्ञ सर्वसामान्य जनता, त्या मधील अनिश्चितता असे असंख्य पैलू ‘सॅटर्डे संडे’ सिनेमात प्रेक्षकांना पहाता येतील. अंडरवर्ल्डमध्ये कुविख्यात असलेले, टोळीला नको असलेले शार्प शूटर पोलिसांच्या डेथ लिस्टवर येतात. सोमवारचा सूर्योदय पहायचा असेल तर आपआपसातील दुश्मनी बाजूला ठेवून शनिवार-रविवारी एकत्र जमावे लागेल असा निरोप येतो, तो ही राज्याच्या गृहमंत्र्यांच्या पीए कडून. त्यानंतर घडणाऱ्या रणधुमाळीत नक्की काय घडतं हे सिनेमात पहाणे मनोरंजक ठरणार आहे. चित्रपटाचे कथालेखन दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनीच केले आहे. अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेल्या मकरंद देशपांडे दिग्दर्शित  ‘सॅटर्डे संडे’ चित्रपटात मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, नेहा जोशी, अमृता सुभाष, अमृता संत, असीम हट्टंगडी, नुपूर, संदेश आदी कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 8:49 am

Web Title: first look of saturday sunday movie launch by anurag kashyap
टॅग : Marathi Movies
Next Stories
1 रोहित शेट्टीसोबत काम करण्याची आलियाची इच्छा
2 मराठीत पहिल्यांदाच सिक्वल कॉमेडी
3 ‘लोपामुद्रा’ मराठी काव्यसंग्रहासाठी प्रसिद्धीच्या नवीन आयडिया