News Flash

वासूगिरी जशी आहे तशी

छोटय़ा बजेटच्या हिंदी चित्रपटांमधून सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषय अलीकडे कमीअधिक प्रमाणात चांगल्या प्रकारे हाताळलेले दिसतात.

| March 22, 2015 05:12 am

छोटय़ा बजेटच्या हिंदी चित्रपटांमधून सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषय अलीकडे कमीअधिक प्रमाणात चांगल्या प्रकारे हाताळलेले दिसतात. ‘हंटर’ हा हिंदी सिनेमाही २० ते ३० वयोगटातील तरुणांच्या मनातील सुप्त आकांक्षांचे सरळ चित्रण करणारा चित्रपट आहे. ‘वासूगिरी’ जशी होती किंवा असते तशी दाखविण्याचा rv14धाडसी प्रयत्न करताना दिग्दर्शकाने चित्रपटावरती आपली पकड शेवटपर्यंत कायम ठेवत केवळ सवंग चित्रण न करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
मंदार पोंक्षे हा मराठी तरुण शालेय वयापासूनच ‘वासूगिरी’ करणारा मुलगा आहे. ऐन तारुण्यात तो वासूगिरीमध्ये माहिर बनतो आणि त्याचे अनुभव मित्रांना सांगतो. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना भेटलेल्या मुली, त्यांच्या मागे लागून त्यांना तात्पुरते गटविण्याचे त्याचे कसब, वासूगिरी करताना दोन-चार वेळा त्याच्यावर अनवस्था प्रसंग ओढवतात. त्याचे चित्रणही दिग्दर्शकाने चांगले केले आहे. वासूगिरीचे समर्थन करणे किंवा त्याला विरोध करणे अशी कुठलीही बाजू न घेता फक्त थेट चित्रण दिग्दर्शकाने केले आहे. हे चित्रण करताना दिग्दर्शकाने मर्यादित स्वातंत्र्य घेतले आहे. क्वचित ठिकाणी ‘फिल्मी’ पद्धतही वापरली आहे. प्रेक्षकाला पुढे काय होईल याचा अंदाज करण्याची भरपूर मुभा दिली असली तरी सरतेशेवटी आपल्याला जे सांगायचे आहे त्याकडे दिग्दर्शक कथानक घेऊन जातो.
मंदार पोंक्षेची व्यक्तिरेखा पाहताना प्रेक्षकांना या व्यक्तिरेखेच्या प्रवृत्तीशी साधम्र्य सांगणाऱ्या व्यक्ती पाहिल्याचे जाणवेल.  मंदार पोंक्षे या व्यक्तिरेखेची  दिग्दर्शकाने अस्सल मांडणी केली आहे. म्हणूनच प्रेक्षकाला चित्रपट पाहताना मंदार पोंक्षेसारखी व्यक्तिरेखा कुठे ना कुठे पाहिली असल्यासारखे वाटेल. अगदी शारीरिक संबंध म्हणून जरी एखाद्या स्त्रीच्या मागे लागले नाहीत तरी गोंडा घोळणाऱ्या पुरुषांची संख्या (वयोगट कुमारावस्था ते वृद्ध) काही कमी नाही हे आजूबाजूला पाहताना प्रेक्षकाला सहज जाणवते.rv07
तरुणी आणि बायकांच्या मागे लागून शरीरसंबंधांसाठी आसुसलेला तरुण मंदार पोंक्षे ही व्यक्तिरेखा गुलशन देवय्याने अप्रतिम साकारली आहे. चित्रपटात आयटम साँग असते त्याप्रमाणे दिग्दर्शकाने सई ताम्हणकरची भूमिका दाखवून किंचित अतिशयोक्ती म्हणावी तशी केली आहे. सई ताम्हणकरचा पहिला हिंदी चित्रपट म्हणावे असे मात्र नक्कीच नाही, इतकी तिच्या भूमिकेची लांबी कमी आहे. उत्कृष्ट अभिनयाची आणखी एक झलक राधिका आपटे या अभिनेत्रीने तृप्ती या व्यक्तिरेखेद्वारे दाखवली आहे. या चित्रपटात ती भाव खाऊन गेली आहे.
वासूगिरी करणारा मंदार पोंक्षे कुणाशी प्रेमविवाह किंवा ठरवून विवाह करू शकत नाही, त्याने तसे करूही नये असे त्याच्या मित्रांचे मत आहे. परंतु वासूगिरीमुळे अनेकदा अनवस्था प्रसंग ओढवून घेतल्यानंतर लग्न करावे असा लकडा घरची मंडळी त्याच्यामागे लावतात आणि त्याची भेट तृप्तीशी होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. मंदार पोंक्षे शाळकरी वयात असताना बी ग्रेड हिंदी अश्लील चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जातो तो प्रसंग असो की झाडं सुकून जातात म्हणून वाडय़ाच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून लघुशंका करणारा मंदारचा चुलतभाऊ क्षितिजचा प्रसंग असो, अशा छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून वासूगिरी करणाऱ्या तरुणांची मानसिकता दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. वासूगिरीची प्रवृत्ती नेमकी दाखविण्याचा समर्थ प्रयत्न चित्रपट करतो. छोटय़ा छोटय़ा हलक्याफुलक्या प्रसंगांतून विनोदाची पेरणी करीत आपल्याला गंभीर संदेश वगैरे द्यायचा नाही तर जे आहे जसे आहे तसे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. मोबाइलचा वापर सर्रास होऊ लागला, परंतु स्मार्टफोनचा जमाना यायचा होता, तसेच इंटरनेटचा सर्रास वापर वाढला नव्हता अशा नव्वदच्या दशकातील शेवटचा काळ फ्लॅशबॅक म्हणून दाखवीत थेट २०१५ चा वर्तमान काळ असा कालावधी कथानकासाठी वापरला असून तो सयुक्तिक ठरतो. संगीत, छायाचित्रण, संवादलेखन, संकलन अशा विविध विभागांचे पूरक काम यामुळे चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे या चित्रपटाद्वारे ठणकावून मांडले आहे.

हंटर
निर्माते – कीर्ती नाखवा, अनुराग कश्यप, रोहित चुगानी, केतन मारू, विकास बहल, विक्रमादित्य मोटवाने.
दिग्दर्शक – हर्षवर्धन कुलकर्णी
पटकथा – प्रज्वल जोशी
छायालेखक – जॉन जेकब नायापल्ली
संकलक – कीर्ती नाखवा
संगीत – खामोश शहा
कलावंत – गुलशन देवय्या, राधिका आपटे, सई ताम्हणकर, सागर देशमुख, वीरा सक्सेना, राचेल डिसूझा.

-सुनील नांदगावकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 5:12 am

Web Title: hunterrr review by sunil nandgaonkar
Next Stories
1 नववर्षस्वागताची जल्लोषयात्रा
2 एक उरकलेला सोहळा!
3 डोंबिवलीच्या स्वागतयात्रेत महिलांचा सहभाग मोठा
Just Now!
X