बॉलिवूडमध्ये फार कमी असे कलाकार आहेत ज्यांनी त्यांचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता गोविंदा. गोविंदा यांनी त्यांच्या विनोदी शैलीमुळे प्रत्येक चाहत्याच्या मनात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं. एकेकाळी बॉलिवूडवर राज्य गाजविणारा हा कलाकार आजही ‘एव्हरग्रीन अभिनेता’ म्हणून ओळखला जातो. त्याचा हाच एव्हरग्रीननेस दाखविण्यासाठी गोविंदा सज्ज झाला असून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गोविंदा लवकरच त्याच्या आगामी ‘फ्राईड’ या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गोविंदाने त्यांचा जीवनप्रवास, यश-अपयश याविषयी काही किस्से शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसापासून गोविंदाचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई करु शकला नाही, त्यामुळे त्याच्यावर अपयशी हा ठपका लावण्यात आला. मात्र याविषयी त्याने त्याचे मत व्यक्त केलं आहे.

अक्षयकुमार स्टारर ‘हॉलिडे’ या चित्रपटामध्ये गोविंदाने केलेली भूमिका प्रशंसनीय होती. त्यानंतर त्याचा ‘आ गया हीरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. या चित्रपटाचं अपयशानंतर गोविंदा फार कमी चित्रपटांमध्ये झळकल्याचं पाहायला मिळालं.

‘बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून मी अनेक यश-अपयशाचे खेळ पाहिले आहेत. एकेकाळी मी यशाचं शिखर गाठलं होतं. मात्र मध्यंतरी माझे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावं तशी कमाई करु शकले नाही. परंतु यातून माझं अपयश सिद्ध होत नाही. मी माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये स्वत: चा प्राण ओतला आहे. त्यामुळे चित्रपट जरी अपयशी ठरले तरी मी कधीच अपयशी नव्हतो’, असं गोविंदा म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘जो पर्यंत एखादा कलाकार स्वत: ला अपयशी मानत नाही तोपर्यंत त्याची हार झालेली नसते. तो विजयीच असतो. कारण त्याच्यात जिंकण्याची जिद्द असते. माझ्यावर अनेक संकट आली. मात्र मी स्वत:ला कधीच अपयशी समजलो नाही किंवा घाबरुन माघारही घेतली नाही. मी माझे प्रयत्न करत राहिलो’.

दरम्यान, गोविंदाचा आगामी ‘फ्राईड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये गोविंदाबरोबर दिगांगना सुर्यवंशी, वरुण शर्मा आणि बृजेंद्र काला हे कलाकार स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.