जवळपास अडीच महिन्यांपासून राज्यात लॉकडाउनचा कालावधी सुरु आहे. या काळात सारं काही ठप्प असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. त्यासोबतच ते राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार पुढील निर्णय घेत आहेत. मात्र अनेक वेळा त्यांच्यावर विविध स्तरांमधून टीका करण्यात येत आहे. परंतु, अभिनेता जितेंद्र जोशीने मात्र मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. तसंच त्यांच्या कामाचं कौतुकही केलं आहे.

अलिकडेच अभिनेता जितेंद्र जोशी याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने राज्यात सुरु असलेल्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. तसंच त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं प्रशासन जे काही काम करतायेत, त्यावर अनेक जण टीका करत आहेत. मात्र ठाकरे सरकार येऊन किती दिवस झाले? टीका करणं सोपं आहे. पण आज करोनाच्या संकटकाळात त्यांच्या जागी इतर कोणीही त्या खुर्चीवर असतं तरी डोक्याला हात लावला असता”, असं जितेंद्र म्हणाला.

दरम्यान, या मुलाखतीत त्याने समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर त्याचं मत मांडलं. जितेंद्र बऱ्याच वेळा समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होताना दिसत असतो.