अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद (सस्पेंड) करण्यात आले आहे. ट्विटरचे नियम मोडल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईवरुन अभिनेता कमाल आर खान याने रंगोलीवर उपरोधिक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाला कमाल खान?

“रंगोलीचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. ट्विटर वापरणाऱ्या प्रत्येकाला काही नियम माहित असणं गरजेचं आहे. कोणालाही धमकी देऊ नका, कोणाच्याही धर्मावर ट्विट करु नका, कोणालाही शिवीगाळ करु नका”, अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे. कमाल खान उर्फ केआरकेचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

रंगोली आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असते. ट्विटरद्वारे ती अनेकदा इतरांवर आरोप-प्रत्यारोप, टिकाटिप्पणी करताना दिसते. मात्र ते करताना ट्विटरच्या नियमांकडे तिने दुर्लक्ष केलं.

गेल्या काही दिवसांपासून ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केल्याने चर्चेत होती. ‘महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वाची गरज आहे’,असं म्हणत तिने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आता ट्विटरवर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर रंगोली व कंगना रणौत या दोघींची नावं ट्रेण्ड होत आहेत. काहींनी रंगोलीला पाठिंबा देत तिची काय चूक आहे, असा प्रश्न विचारला तर काहींनी तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.