बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. आता कंगनाने भारतातील वाढत्या लोकसंख्येवर संतप्त होऊन ट्वीट केले आहे. त्याचबरोबर कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये देशातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे देखील नाव घेतले आहे.

कंगना वाढत्या लोकसंख्येवर केलेले ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. ‘आपल्याला लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कायद्यांची गरज आहे. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी मतदानाचे राजकारण करत असताना लोकांची जबरदस्तीने नसबंदी केली. ज्यामुळे त्या निवडणूक हरल्या आणि नंतर त्यांची हत्या देखील करण्यात आली. परंतु, आजच्या काळात भारताची वाढती लोकसंख्या आपल्यासाठी संकट आहे. एखाद्याला तिसरं मूल झालं तर त्याला दंड किंवा काही वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे,’ अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे. कंगनाने थोडक्यात तिसरं अपत्य होऊ देणाऱ्या पालकांना कडक शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले आहे.

कंगनाने आणखी एक ट्विट केले आहे, त्या ट्विटमध्ये कंगनाने वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचे म्हटले आहे. सोबतच ती म्हणाली की, ‘कागदावर जरी भारताची लोकसंख्या ही १३० कोटी दिसत आहे. तरी, त्या व्यतिरिक्त २५ कोटीं पेक्षा जास्त लोक हे दुसऱ्या देशातून बेकायदेशीर पणे भारतात स्थलांतरीत झाले आहेत.’ कंगनाने हे ट्वीट करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सगळ्यांना उपचार मिळत नसल्याच्या आशयात केले आहे.

दरम्यान, कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या आयुष्यावर आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.